वसई : वसई पूर्वेच्या धुमाळनगर येथे विहिरीत बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. समशूल खान असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वसई पूर्वेच्या भागात धुमाळनगर परिसर आहे. या भागात असलेल्या विहिरीत रविवारी दुपारच्या सुमारास तीन ते चार मुलांचा गट पोहण्यासाठी आला होता. पाण्यात पोहत असताना समशूल हा मुलगा पाण्यात बुडाला. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती. येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश शेळके यांनी याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली होती. त्यानंतर त्यांनी शोध कार्य करून जवळपास पाच तासानंतर समशूल याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घडलेल्या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आठवडा भरापूर्वीच तुंगारेश्वर येथील नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. सातत्याने अशा बुडून मृत्यू होण्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
विहिरीला सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी
वसईच्या धुमाळनगर येथील या विहिरीत नेहमीच स्थानिक मुले पोहण्यासाठी उतरतात. अनेक वेळा नागरिकांनी या विहिरीवर लोखंडी जाळी बसवण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाले आणि ती विहीर खुलीच राहिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तातडीने सुरक्षा जाळ्या बसविण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नागेश शेळके यांनी केली आहे.