विरार : मोबाईल आणि त्यावर सतत गेम खेळण्याचे वेड मुलांच्या जीवावर बेतू लागले आहे. नालासोपाऱ्यात राहणार्‍या एका २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला मोबाईल गेम खेळण्याची सवय होती. त्या गेमचे व्यसन लागले आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. मागील आठवड्यात देखील विरार मध्ये १२ वर्षीय मुलाने आईने मोबाईल न दिल्याने आत्महत्या केली होती.

आर्यन सिंग हा (२०) हा तरुण नालोसापारा पूर्वेच्या तुळींज येथील साईहरी अपार्टमेंट मध्ये आपल्या मामा आणि मामी सोबत रहात होता. तो मुळचा उत्तरप्रदेशातील प्रतापगड येथे राहणारा आहे. त्याचे आई वडील गावी असतात तर आर्यन शिक्षणासाठी नालासोपारा येथील मामाकडे रहात होता. गुरूवारी रात्री घरात कुणी नसताना त्याने स्वयंपाक घरातील पंख्याल साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येतात कुटुंबियांनी त्याला पालिकेच्या विजय नगर येथील तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

स्वयंपाक घरातील फ्रिजवर त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली. ही चिठ्ठीत इंग्रजीत होती. मी आयुष्याला कंटाळलो आहे. माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही, असा मजकूर या चिठ्ठीत त्याने लिहून ठेवला होता. आर्यन हा कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयात १४ वी मध्ये शिकत होता.

त्याला मोबाईल गेमचे व्यसन लागले होते. सतत तो मोबाईल गेम खेळून त्याला नैराश्य आले होते, असे आर्यनचा मामा शत्रुधन सिंग याने तुळींज पोलिसांना सांगितले. आर्यनचे मूळ गाव उत्तरप्रदेशातील प्रतापगढ येथे असून त्याचे आई वडिल गावी राहतात. याप्रकरणी आम्ही अपमृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे तपासिक अंमलदार कदम यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठवड्याभरातील दुसरी आत्महत्या

मागील आठवड्यात विरारच्या उंबऱगोठण येथे राहणार्‍या १२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो सतत मोबाईल बघत असायचा. अभ्यास करत नाही, मोबाईल मध्ये गेम खेळत असल्याने त्याची आई त्याला ओरडली होती. आईने मोबाईल काढून घेतल्याने त्याने आत्महत्या केली होती. तो सहावीत शिकत होता. मोबाईल वापरामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असतानाच आता मोबाईलमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या करणाऱ्यांचे विशेतः शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांचे प्रमाण वाढते आहे. अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराचे प्रमाण वाढत आहे. यासाठी पालकांनी मुलांच्या कलाने समजून त्यांना अतिवापरापासून दूर ठेवायला हवे, असे समुपदेशक मिलिंद पोंक्षे यांनी सांगितले.