सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या (आर्टिफिशल इंटेलिजन्स) आधारे तरुणींची अश्लील छायाचित्रे बनविल्याच्या प्रकरणात आता आणखी २३ तरुणी समोर आल्या आहेत. या मुलींनी छायाचित्रे अश्लील संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून आंतरराष्ट्रीय कॉल्स येत असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी सखोल चौकशीसाठी थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या असून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावात राहणाऱ्या जीत निजाई (१९) या तरुणाने एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे तरुणींची अश्लील छायाचित्रे तयार करून ती इन्स्टाग्रामवरील बनावट खात्यातून तसेच अश्लील संकेतस्थळांवर (पॉर्न साइट) व्हायरल केली होती. या प्रकरणी दोन अल्पवयीन तरुणींनी तक्रार दिल्यानंतर अर्नाळा सागरी पोलिसांनी जीत निजाई आणि त्याचा भाऊ यश निजाई याला अटक केली होती. एआय तंत्रज्ञान वापरून करण्यात आलेला हा राज्यातील पहिला गुन्हा होता. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाला आहे. आणखी २३ तरुणी पुढे आल्या असून आरोपीने अश्लील छायाचित्रे बनविल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आता वाढली आहे.

हेही वाचा >>> मीरा-भाईंदरमधील १७ गुंड तडीपार; पोलीस उपायुक्तांचा निर्णय, सहा जणांवरील कारवाई अंतिम टप्प्यात

आम्ही पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेलो होतो, मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, असा आरोप एका पीडित तरुणीने केला. याप्रकरणी तरुणींनी आगरी सेनेची मदत घेतली आणि त्यामार्फत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे तकार केली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणात योग्य तपास करत नाही. या पीडित मुलींना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल्स येऊ लागले आहेत. त्यामुळे ही घटना एका आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भाग आहे, असा आरोप आगरी सेनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी केला. या २३ मुलींपैकी सर्वात लहान पीडित मुलगी अवघ्या १३ वर्षांची आहे.

हेही वाचा >>> वसई, विरारमध्ये रस्ते अपघातांत वाढ; ७ महिन्यांत ८२ मृत्यू, १३१ जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोबाइलमध्ये ९ मुलींची छायाचित्रे..

अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपी जीत निजाईच्या मोबाइलमध्ये ९ मुलींची अश्लील छायाचित्रे सापडल्याचे सांगितले. उर्वरित छायाचित्रे आरोपीने नष्ट (डिलीट) केली आहेत. आम्ही आरोपीचा भ्रमणध्वनी तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) मध्ये पाठवला आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे प्रत्येक मुलींचा स्वतंत्र गुन्हा दाखल करता येत नाही. आम्ही संबंधित पीडित मुलींचे जबाब नोंदवत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.