वसई:- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकापाठोपाठ एक अशा अपघाताच्या घटना समोर येत आहेत. पेल्हार येथील ट्रकच्या धडकेत पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी दुपारी नायगाव बापाणे जवळ एका ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला आहे. दिनेश विश्वकर्मा (३२) असे या तरुणाचे नाव आहे.
वसई विरारच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावरील वाढत्या वर्दळीमुळे अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्याने महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास नायगाव बापाणे जवळ मुंबई वाहिनीवर एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
दिनेश विश्वकर्मा असे या तरुणाचे नाव असून तो भोयदापाडा येथे राहत होता. मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सातत्याने अपघाताच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
या पूर्वीच्या अपघात घटना
२ नोव्हेंबर २०२५ – मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी पेल्हार येथे साडे नऊच्या सुमारास भरधाव ट्रकची रिक्षाला धडक लागून भीषण अपघात घडला होता. या भीषण अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला.
३० ऑक्टोबर २०२५ – गुरुवारी पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत नालासोपारा फाटा येथे कंटेनरचा टायर फुटून नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनरचा अपघाता झाल्याची घटना घडली होती. यावेळी हा कंटेनर कठडा तोडून थेट खाली उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळला. या अपघातात डहाणू येथील अंजली जिग्नेश दुबला (३८) या महिलेचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते.
