व्यवसायासाठी तीन तास वेळ वाढली तरी दुकानदारांची नाराजी कायम
विरार : वसई-विरार परिसरात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना प्रशासनाचे टाळेबंदीचे नियम शिथिल करत दुकानदारांना काहीसा दिलासा देत २ जूनपासून दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची मुभा दिली. पण ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने दुकानदारांची चिंता वाढली आहे. ग्राहक नसल्याने दुकानदारांत नाराजीचे वातावरण दिसत आहे.
वसई-विरारमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लादत केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने मागील दोन महिन्यांपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्याचे आदेश दिले होते. तर इतर दुकाने पूर्णत: बंद होती. पण मे महिन्यात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रशासनाकडून नियम काहीसे शिथिल करत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते २ तर इतर दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ तर शनिवार आणि रविवार ही दुकाने बंद राहतील, असे आदेश दिले आहेत. यामुळे इतर दुकानदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
वसई-विरारमधील सर्व दुकाने दोन महिन्यांनंतर उघडल्याने शहरात रेलचेल वाढेल असे वाटले होते. पण चित्र उलट दिसत आहे. दुकाने उघडूनही ग्राहकांची रेलचेल वाढली नसल्याने दुकानदारांच्या चिंता वाढल्या आहेत. टाळेबंदीत दुकानासमोर लागणाऱ्या रांगा नियम शिथिल होताच गायब झाल्या आहेत.
विरारमधील कपडय़ाच्या दुकानाचे व्यापारी विजय दोषी यांनी सांगितले की, सोमवार ते शुक्रवार लोकांना कामावर जावे लागते. तर अनेकांना सकाळ ते दुपारच्या वेळेत घरूनच काम करावे लागते. मुळात शनिवार आणि रविवार या दिवशी ग्राहकांची रेलचेल असते. पण याच दिवशी दुकाने बंद ठेवावी लागणार मग धंदा कसा होणार, आधीच टाळेबंदीमुळे मागील वर्षभरापासून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडण्यास धजावतात. त्यातही ऑनलाइन कंपन्यांनी पुरता धंदा बुडवला आहे.
नालासोपारा येथील किसन सिंग या व्यापाऱ्याने सांगितले की, पालिका केवळ दुकानदारांवर टाच लावते. मात्र शहरात वाढत्या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करत नाही. फेरीवाले मोठय़ा प्रमाणात रस्त्यांवर गर्दी करून सामान विकत आहेत. यामुळे ग्राहक दुकानांकडे वळत नाहीत. यामुळे दुकाने खुली करूनही ग्राहक नाहीत. पालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई करावी. एकूणच सध्या प्रशासनाकडून दुकानदारांना दिलासा दिला असला तरी ग्राहकांनी पाठ फिरवल्याने दुकानदारांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.