भाईंदर: पतीच्या घराचा ताबा घेण्यासाठी चक्क दुसऱ्या पत्नीने तिसऱ्या मजल्यावर क्रेनच्या साहाय्याने घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मिरा रोड येथे घडली आहे. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिला आणि क्रेन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिरा रोड येथील ‘अपना घर फेज-२’ इमारतीत शारगुल खान हे तिसऱ्या मजल्यावर राहतात. खान यांनी दोन विवाह केले असून, पहिल्या पत्नीचे नाव रोशनी आणि दुसऱ्या पत्नीचे नाव शीतल आहे. सदर घर रोशनीच्या नावावर असल्यामुळे ती तिथे वास्तव्यास होती. मात्र या घराच्या ताब्यावरून गेल्या काही दिवसांपासून या तिघांमध्ये वाद सुरू होता. घराचा ताबा मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शीतलने बुधवारी क्रेनच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरात प्रवेश करून तिने रोशनीला मारहाण केली आणि तिला घराबाहेर काढले. याबाबत रोशनीने रात्रीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून शीतलला अटक करण्यासाठी एक पथक सकाळी घटनास्थळी पाठवले. मात्र, तोपर्यंत शीतलने तेथून पळ काढला होता. काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगडवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोपी महिला, क्रेन चालक आणि मदत करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी लढवली युक्ती:
काही महिन्यांपूर्वी शारगुलने घरात एसी बसवण्यासाठी क्रेन बोलावली होती, ही माहिती शीतलला होती. त्यामुळे तिने नवीन एसी लावण्याचे कारण देत क्रेन चालकाला बोलावले. मात्र घटनास्थळी कोणताही एसी नसल्याचे लक्षात आल्यावर चालकाने विचारणा केली. त्यावर शितलने सांगितले की, तिचा पतीसोबत वाद झाला असून तो घर उघडत नसल्यामुळे ती क्रेनच्या मदतीने घरात शिरत आहे.