वसई : पती पत्नीच्या भांडणाचा फटका वसईतील एका वकिलाला बसला आहे. चिडलेल्या पतीने भाडोत्री गुंड पाठवून या महिलेच्या वकिलावरच चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वसईत घडली आहे. वालीव पोलिसांनी हल्लेखोर असलेल्या भाडोत्री गुंडाला अटक केली आहे तर फरार आहे. एका महिलेने तिचा पती इंद्रजीत शर्मा याच्याविरोधात मुंबईच्या धारावी पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा तसेच कौटुंबिक न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केला आहे. वसईत राहणारे मोहसीन अनीस अब्बासी (३०) हे या महिलेचे वकील आहे. महिलेच्या वतीने ते न्यायालयात खटला लढवत आहेत. महिलेचा पती इंद्रजीत शर्मा याने वकील अब्बासी यांना संपर्क करून प्रकरण मागे घेण्यास दबाव टाकत होता तसेच खटला मागे घेण्यास प्रलोभन दाखवत होता. मात्र अब्बासी यांनी त्याला नकार दिला होता. त्यामुले इंद्रजीत शर्मा याने अब्बासी यांच्यावर हल्ल्याची योजना बनवली.

असा केला हल्ला…

वालीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मा याने हर्षद वाला (२६) हा तरुणाला हल्ला करण्याचे काम सोपावले. अब्बासी यांना संपर्क केला. एका प्रकरणात वकीलपत्र घ्या म्हणून त्याने अब्बास यांना सांगितले. मात्र अब्बासी यांनी त्याला नकार दिला होता. वाला याने मग अब्बासी यांच्या सहकार्‍यांंकडून अब्बासी यांचे तपशील काढले आणि कार्यालयात भेटायला गेला. रमझानचा महिना सुरू असल्याने अब्बासी रात्री उशीरा कार्यालयात आले होते. त्यावेळी हर्षद वाला त्यांना भेटायला आला आणि पुन्हा त्याचे वकीलपत्र घेण्याची विनंती केली होती. मात्र त्याला अब्बास यांना नकार दिला. यानंतर त्याने परत जाण्यासाठी ‘ओला’ गाडी बुक केल्याची थाप मारली आणि काही वेळ तिथेच घुटमळत होता. नंतर ओला गाडी आली नसल्याचे कारण देत त्याने वकील अब्बासी यांना अर्ध्या रस्त्यात सोडण्याची विनंती केली. त्यानुसार अब्बास याने आपल्या गाडीत त्यांना सोबत घेतले.

अब्बास गाडी चालवत होते. वसई पूर्वेच्या शालीमार हॉटेलजवळ गाडी पोहोचताच वाला याने आपल्या खिशातून चाकू काढून चालत्या गाडीत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. कशीबशी त्यांनी गाडी थांबवली आणि मदतीचा धावा केला. स्थानिकांनी मग वाला याला पकडून वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले. मी त्या महिलेचे वकीलपत्र घेतले होते. तिला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करत होतो. शर्मा याच्या कुठल्याही दबावाला किंवा आमिषाला मी बळी पडलो नाही, असे वकील अब्बासी यांनी सांगितले. अब्बासी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी वाला याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८ (१) ६१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाचा मुख्य आरोपी इंद्रजीत शर्मा हा फरार आहे. वालीव पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी वाला हा नेमका कोण आहे? तो भाडोत्री गुंड आहे का? त्याचा हल्ला करण्यामागे काय उद्देश आहे? याचा आम्ही तपास करत आहोत अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.