भाईंदर: दहिसर भाईंदर उन्नत मार्गाच्या उभारणी दरम्यान खाजगी तसेच शाससकीय जागेवरील जवळपास २९७ झाडांची कत्तल केली जाणार आहे.याबाबतची जाहीर नोटीस प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.दहिसर-भाईंदर उन्नत जोडरस्ता (डीबीएलआर) हा मुंबई महापालिकेचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत १.५ किमीचा उन्नत मार्ग आणि मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत ३.५ किमी उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे.
मुंबई आणि मिरा-भाईंदर या दोन महानगरपालिकांच्या क्षेत्राला जोडणाऱ्या या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी बृहन्मुंबई महानगरपालिका करीत आहे. एकूण ६० मीटर रुंंद आणि ५ किलोमीटर लांब असा हा मार्ग असून यासाठी तीन हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे.यामुळे भविष्यात दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम हे अंतर दहा मिनिटांत विना सिग्नल पार करता येणार आहे.
त्यानुसार या रस्त्याच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.मात्र यात खाजगी तसेच शासकीय जागेवर जवळपास २९७ झाडे ही बाधित होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.म्हणून ही झाडे मुळासहीत काढण्यासाठी २२ मे २०२५ रोजी मिरा भाईंदर महापालिकेने जाहीर सूचना आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी सात दिवसाचा कालावधी नागरिकांना देण्यात आला होता. अखेरच्या तारखेपर्यंत काही मोजक्याच हरकती आल्या असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसात ही झाडे कापली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.