भाईंदर : सलग दुसऱ्या वर्षी भाईंदर येथील बाळासाहेब ठाकरे मैदानाची दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. खासगी कार्यक्रमांच्या आयोजनामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात. त्या वाहनांच्या वर्दळीमुळे त्या ठिकाणचे गवत उखडले जात असल्याचे मैदान ही उंच सखल झाले आहे. त्यामुळे सपाटीकरणासह अन्य डागडुजीसाठी महापालिकेला पुन्हा लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.
भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक परिसरात असलेले बाळासाहेब ठाकरे मैदान हे महापालिकेचे भव्य आणि मोठे मैदान आहे. नागरी वस्तीत असलेल्या या मैदानात दररोज मोठ्या संख्येने मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी व व्यायामासाठी येत असतात. या मैदानाच्या देखभालीसाठी प्रशासनाने आजवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून या मैदानाचा वापर मोठ्या प्रमाणावर राजकीय तसेच खासगी कार्यक्रमांसाठी केला जात आहे.
नुकतेच या मैदानात प्रसिद्ध कथा वाचक देवकीनंदन ठाकूर यांच्या श्रीभागवत कथा वाचनाचा कार्यक्रम २ ते ८ नोव्हेंबरदरम्यान पार पडला. या कार्यक्रमासाठी मैदानात मोठ्या प्रमाणात मंडप उभारण्यात आले होते. भक्तांची संख्या मोठी असल्याने मैदानातच चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली होती. परंतु या वाहनांमुळे मैदानातील गवत उखडून माती बाहेर आली असून, वाहनांच्या सततच्या हालचालीमुळे मैदान पूर्णपणे असमांतर झाले आहे. याशिवाय मैदानात खड्डे पडले, झाडांचे नुकसान झाले आणि इतर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, मैदान पूर्ववत करण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेला लाखो रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
गेल्याच वर्षी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या मैदानात राष्ट्रीय संत संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळीही मैदानाची अशीच अवस्था झाली होती आणि वाहनांची ने-आण करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार तोडण्यात आले होते. ते दुरुस्तीचे काम अजूनही पूर्ण झालेले नसताना, यंदा पुन्हा मैदानाची हानी झाल्याने स्थानिक जागरूक नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.
प्रशासनाकडून मैदान भाड्याने देण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष
मैदान भाड्याने देण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ३७ (अ) नुसार धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार वर्षभरात केवळ ४५ दिवसांपर्यंत मैदान विविध कार्यक्रमांसाठी वापरण्याची मर्यादा आहे. त्यात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महापुरुष जयंती आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम यांनाच परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात प्रशासन या नियमांकडे दुर्लक्ष करून हे मैदान वारंवार खासगी आणि राजकीय कार्यक्रमांसाठी भाड्याने देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
