भाईंदर : सोमवारी तिसऱ्या दिवशी सुध्दा पावसाचा जोर कायम राहिल्याने ठाणे मार्गांवरील घोडबंदर घाट रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत होऊन ठिकाणी ठिकाणी वाहतूक कोंडीची निर्माण होऊ लागली आहे.

ठाण्याच्या घोडबंदर मार्गांवरील गायमुख ते वर्सोवा चौक (फाउंटन हॉटेल) पर्यंतचा साडेचार किलोमीटर लांबीचा रस्ता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महापालिका प्रशासनावर आहे. दरम्यान, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी वारंवार प्रवाशांकडून करण्यात येत होत्या.

मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची पाहणी करून तात्काळ दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांना दिल्या होत्या. त्यानुसार तीन दिवस अवजड वाहनांना बंदी घालून घोडबंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती प्रशासनाने पूर्ण केली. मात्र ठाण्यावरून घोडबंदरकडे येणाऱ्या मार्गाचे काम अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेना गावापासून पुढे फाउंटन हॉटेल परिसरात रस्त्यावर पाणी साचत असल्याचे समोर आले आहे. डोंगर उताऱ्यावरून वाहून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग न झाल्यामुळे ते एका ठिकाणी साठत आहे. परिणामी, या पाण्यातून वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही वाहने पाण्यातच बंद पडत असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. घोडबंदर मार्गावर वाहनांची प्रचंड रहदारी असल्याने सकाळच्या वेळेत या मार्गावर तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे.

“घोडबंदर मार्गावर पाणी साचल्याची तक्रार आली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून समस्येचे निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” – दीपक खांबित, शहर अभियंता (मिरा-भाईंदर महानगरपालिका)

पाणी काढण्यासाठी संक्शन पंप

घोडबंदर मार्गावरच साचलेले पाणी काढण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला सूचना दिल्या आहेत. त्यावर कंत्राट दाराकडून रस्त्याच्या कडेला पाणी उपसणारे पंप लावण्यात आले आहेत. तसेच पाण्याचा नैसर्गिक मार्ग मोकळा करण्यासाठी जेसीबीच्या मदतीने मोठी दगड बाजूला केली जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.