वसई : दरवर्षी हिवाळ्याच्या हंगामात वसई विरार शहरात विविध प्रजातीचे आणि प्रकारचे पक्षी स्थलांतर करतात. यात देशातील कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातून स्थलांतरित होणाऱ्या पक्षाचे प्रमाण मोठे असते. यंदाही शहरातील विविध पाणथळ जागांवर हे पक्षी दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षक, अभ्यासक तसेच पक्षीप्रेमींची पाऊले आता वसई विरारच्या दिशेने वळू लागली आहेत.
हिवाळा म्हणजे पक्ष्यांच्या स्थलांतराचा काळ. या काळात उष्ण हवामानाच्या ठिकाणाहून थंड हवामानाच्या ठिकाणी पक्षी स्थलांतर करतात. वसई विरार शहरातही भुईगाव, गोगटे मिठागर, अर्नाळा समुद्रकिनारा, तुंगारेश्वर अभयारण्य अशा विविध पाणथळ आणि घनदाट जंगलाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचे स्थलांतर होत असते. यंदा हिवाळा जरी सुरू झाला नसला तरी वसई विरारमध्ये पक्ष्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे.
वसई विरारच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पक्ष्यांचा संचार असतो. त्यामुळे हा काळ पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरत असतो. गल, चिलखे, तुताऱ्या, दगडी गप्पीदास, युरेशियन कल्र्यू, व्हिम्बरेल, ऑईस्टर केचर, उघड चोच करकोचा, रंगीत करकोचा, हुदहुद्या, गरुड, ससाणे, घार , खंडय़ा, बगळे, राखी बगळे, फ्लेमिंगो असे विविध प्रकारचे पक्षी येथे वसईत विरारमध्ये आढळून येतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ पक्ष्यांच्या स्थलांतरणासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, डोंबिवली अशा विविध ठिकाणांहून येणारे पक्षीप्रेमी वसई विरारमध्ये गर्दी करू लागले आहेत. दरवर्षी आम्ही वसई विरारमधील आगाशी, भुईगाव या ठिकाणी स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी येतो. या भागात विविध प्रजातीचे पक्षी पाहता येतात. तर या पक्ष्यांमध्ये युरोपियन पक्ष्यांची संख्या लक्षणीय असते, असे प्रतिक्रिया पक्षीप्रेमींनी दिली.
अतिक्रमणामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत घट
वसई विरार शहरात विविध ठिकाणी पाणथळ जागा आणि घनदाट जंगल आढळून येते. पण गेल्या काही काळात झालेल्या शहरीकरणामुळे नैसर्गिक अधिवासातील जागांवर सातत्याने अतिक्रमण केले जात आहे. ज्यामुळे येत्या काही वर्षात स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता पक्षी निरीक्षकांनी वर्तवली आहे. त्यामुळे या जागांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत पक्षीप्रेमींनी व्यक्त केले आहे.
