भाईंदर : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्षातून रिंगणात उतरलेल्या प्रसिद्ध भोजपुरी कलाकार खेसारीलाल यादव यांच्या विरोधात भाजपने दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केल्याची चर्चा रंगली आहे. मिरा रोड येथील त्यांच्या राहत्या घरावरील अनधिकृत पत्राशेडबाबत मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून नुकतीच नोटीस बजावण्यात आली आहे.

देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. या निवडणुकीत एनडीए घटक पक्ष आणि महागठबंधन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी यंदा अनेक प्रसिद्ध भोजपुरी गायक आणि कलाकार देखील राजकारणात उतरले आहेत. त्यामध्ये खेसारीलाल यादव हे छपरा विधानसभा मतदारसंघातून राजद पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रामुख्याने त्यांची लढत भाजप उमेदवाराशी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर खेसारीलाल यादव यांच्यावर दबाव आणण्यासाठी भाजपकडून पावले उचलली जात असल्याची चर्चा असून त्यांच्या मिरा रोड येथील घराला महापालिकेमार्फत नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये घरावर उभारण्यात आलेल्या लोखंडी अँगल आणि पत्राशेडला अनधिकृत ठरवण्यात आले असून ते तातडीने काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

सदर नोटीस ३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली असून सध्या त्यांच्या राहत्या घराला टाळे असल्याचे आणि संपूर्ण कुटुंब बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिक तापल्यास मिरा रोड येथे अतिक्रमणविरोधी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.