वसई : विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर पुन्हा एकदा लिफ्ट मध्ये अडकले होते. रविवारी वसईत स्वयंपुनर्विकास कार्यक्रमासाठी गेले असता लिफ्ट बंद पडली. ते सुमारे २० मिनिटे अडकून पडले होते. पोलिसांच्या मदतीने लिफ्टचे दार उघडून त्यांना बाहेर काढण्यात आले.
रविवारी वसईच्या कौल हेरिटेज सिटी येथे भाजपाच्या वतीने स्वयंपुर्नविकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विधानपरिषदेचे गटनेते आणि मुंबै बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र कार्यक्रमस्थळी जाताना लिफ्ट अचानक बंद पडली होती.
लिफ्टची आणि माझी जुनी दुश्मनी असल्याचे ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वी भिवंडी येथे पक्षाचे शिबिर होते. तेव्हा अर्धातास अडकले होते. अर्धातास मंदा म्हात्रे यांना अक्षरश: फेस आला होता. आणखी विलंब लागला असता तर काही खरं नव्हतं असं ते म्हणाले. अशा प्रकारे लिफ्ट मध्ये अडकणं हे गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.