होली क्रॉस शाळेत २० वर्षांपासून कार्यरत  शिक्षिकेला अटक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: वसईत बोगस डॉक्टरपाठोपाठ बोगस शिक्षिकाचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. वसईच्या निर्मळ येथील होली क्रॉस या नामांकित शाळेतील एक शिक्षिका तब्बल २० वर्षे बनावट पदवीच्या आधारे शाळेत शिकवत होती. शाळा व्यवस्थापनास हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. वसई पोलिसांनी मारिया डायस या बोगस शिक्षिकेला अटक केली आहे.

वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळ येथे होली क्रॉस ही नामांकित शाळा आहे. या शाळेत मारिया डायस या मागील २० वर्षांपासून इंग्रजी विषय शिकवत होत्या. परंतु त्यांच्याकडे बीएडची पदवी नसल्याची माहिती ऑक्टोबर महिन्यात शाळेचे मुख्याध्यापक फादर मायकल तुस्कानो यांना मिळाली. त्यांनी जुने दस्तावेज तपासले त्या वेळी मारिया यांनी सादर केलेले मुंबई विद्यापाठीची बीएडचे प्रमाणपत्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र सापडले. शाळेने संबंधित विद्यापीठातून त्याची खातरजमा केल्यावर दोन्ही प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. मारिया या २००१ पासून शाळेत शिकवत होत्या. त्यांनी मागील २० वर्षांपासून शाळेची, विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आम्ही मारिया डायस यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक फादर मायकल तुस्कानो यांनी दिली. वसई पोलिसांनी मारिया याच्याविरोधात  बनावट कागदपत्र तयार करणे, फसवणूक करणे आदी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. सध्या मारिया या पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे.

बनाव असा उघड..

याबाबत माहिती देताना वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले की, शिक्षिका मारिया यांचे कुटुंबात मालमत्तेवरून वाद होते. त्यामुळे त्यांच्या भावानेच त्या बोगस शिक्षिका असल्याची तक्रार शाळेकडे केली. शाळेचे मुख्याध्यापक फादर मायकल तुस्काने यांनी सर्व शिक्षकांची मूळ कागदपत्रे मागितली होती. त्यावेळी मारिया यांनी यशवंतराव चव्हाण विद्यपीठाचे प्रमाणपत्र दिले. मग शाळेने जुने दस्तावेज तपासल्यावर मारिया यांचे बीएडचे प्रमाणपत्र मिळाले. दोन्ही विद्यपीठात शाळेने माहिती अधिकारात कागदपत्रांची माहिती मागवल्यावर दोन्ही प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bogus teachers vasai doctors ysh
First published on: 29-01-2022 at 00:02 IST