भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील नवघर आणि काशिमीरा येथील जरीमरी तलावात ५१ फूट विठ्ठल मूर्ती उभारण्याचे काम घाती घेण्यात आले आहे. उभारण्यात येणारी मूर्ती ही शहरातील विशेष आकर्षण ठरणार असून येत्या महिन्याभरात याचे लोकार्पण केले जाणार आहे.मिरा भाईंदर शहरात जवळपास १७ तलाव आहेत. या तलावाभवती महापालिकेने उद्यान उभारले आहे. याशिवाय तलावाच्या सुशोभीकरणावर देखील खर्च केला जात आहे.दरम्यान नवघर येथील जुने तलाव व जरीमरी तलावात विठ्ठलाची उंच मूर्ती बसवण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती.त्यावरून यासाठी आवश्यक असलेला निधी देखील शासनाने विशेष निधीच्या तरतुदीखाली मंजूर केला आहे.

त्यानुसार आता ५१ फूट उंच विठ्ठलाची उभी मूर्ती उभारण्याचे काम सुरु आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी नवघर येथील तर २० डिसेंबर रोजी जरीमरी तलावातील मूर्तीच्या लोकार्पण कार्यक्रम प्रशासनाने आयोजित केला आहे.यावेळी विठ्ठल भक्ती कार्यक्रम होणार असून भक्तांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा :

मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मौजे नवघर आरक्षण क्र. २९९ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा तयार व्हावा,यासाठी राज्यशासनाकडे मागणी करण्यात आली होती. या मागणीला अखेर शासनाने हिरवा कंदील दिला असून लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे.