वसई : शुक्रवारी सायंकाळी नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी येथे साईराज अपार्टमेंट नावाची इमारत एका बाजूला कलंडली होती. मात्र शनिवारी सुरू असलेल्या पावसात ही चार मजली इमारत कोसळली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. यापूर्वीच इमारती मधील नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी परिसर असून या भागात साई राज अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे. ही इमारत पंधरा वर्षे जुनी झाली होती. या इमारतीच्या खालील बाजूस एका दुकानात दुरुस्तीचे काम सुरू होते. याचवेळी त्या दुकान दाराने मध्ये येत असलेल्या मुख्य कॉलम तोडण्याचा प्रयत्न केल्याने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही इमारत एका बाजूला कलंडली होती. पालिकेने येथील २० सदनिका मध्ये राहणाऱ्या कुटुंबांना बाहेर काढले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीत असलेल्या राहिवासीयांच्या घरातील सामान बाहेर काढून ही इमारत सील केली होती.
सकाळपासूनच शहरात पावसाचा जोर सुरू आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही इमारत पत्त्यासारखी खाली कोसळली.ज्या वेळी इमारत कोसळली त्यावेळी इमारतीच्या मध्ये कोणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, महापालिका अधिकारी व पोलीस प्रशासन उपस्थित असून कोसळलेल्या इमारतीचा मलबा बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
इमारत खाली करून ती सील केली होती. ही जुनी इमारत असल्याने ती पाडण्याचे काम ही सुरू केले जाणार होते. मात्र त्याआधीच ही इमारत कोसळली. कोणतीही जिवीतहानी झाली नाही. – अश्विनी मोरे, सहायक आयुक्त (प्रभाग ई) महापालिका.
नागरिकांची तारांबळ
साईराज अपार्टमेंट मध्ये २० सदनिका असून त्यात ७० हून अधिक नागरिक वास्तव्यास होते. इमारत एका बाजूला झुकल्याने नागरिकांना बाहेर काढले होते. मात्र जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य इमारतीमध्ये होते. ते साहित्य बाहेर काढण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती. जेवढं शक्य आहे तेवढं साहित्य नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. परंतु बहुतांश साहित्य त्यातच अडकून राहिल्याने त्यात नागरिकांच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले असून या कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहेत.