वसई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून अखेरच्या रविवारची पर्वणी साधत वसई, नालासोपारा मतदारसंघातील उमेदवार, पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार यात्रा काढल्या. त्यामुळे अखेरचा रविवार हा उमेदवारांचा प्रचार वार ठरला आहे.

मागील काही दिवसांपासून वसई नालासोपारा मतदारसंघात राजकीय पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे अखेरच्या रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने याच दिवसाची सुवर्ण संधी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी साधली. सकाळ पासूनच ताई, माई आक्का, विचार करा पक्का अशा घोषणा देत सोसायट्या, झोपडपट्ट्‌या, गाव पाडे,  चाळींमधील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवाराकडून प्रचार करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा >>>मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी बाईक रॅली काढली तर काही कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांच्या घरोघरी भेटी देत प्रचार केला. काँग्रेसच्या विजय पाटील विविध सामाजिक संघटना, देवस्थाने यासह विविध ठिकाणी गाठीभेटी घेत प्रचार केला. भाजपच्या स्नेहा दुबे यांनी ही आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघात प्रचार फेऱ्या काढत यावेळी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.तर नालासोपारा मतदारसंघात ही बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे राजन नाईक, प्रहारचे धनंजय गावडे, काँग्रेसचे संजय पांडे, मनसेचे विनोद मोरे यासह अन्य उमेदवारांनी ही मतदारांच्या गाठी भेटी घेत प्रचार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रचारासाठीचा निवडणूक पूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या जाणार आहेत. आपल्या पदरात अधिकचे मतदान पडावे यासाठी गाठीभेटी दरम्यान मतदारांना विविध अश्वासनांची खैरात ही करण्यात आली.