भाईंदर : मिरा रोड येथील महापालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयाच्या इमारतीवरील सजावटीसाठी बसवण्यात आलेला सिमेंटचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून ते इमारतीची पाहणी करत आहेत.

मिरा-भाईंदर शहरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे रस्त्यावर पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, दुपारी अकराच्या सुमारास मिरा रोड येथील महापालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयाच्या बाहेरील बाजूचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे.सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.

हा भाग केवळ इमारतीच्या सजावटीसाठी बांधण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच इमारतीची देखभाल-दुरुस्ती करून रंगकाम करण्यात आले होते. मात्र त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सततच्या पावसामुळेच हा सिमेंटचा भाग कोसळल्याचा दावा केला जात आहे. सध्या महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी असून मलबा काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, उपायुक्त सचिन बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला या इमारतीची तात्काळ संरचनात्मक तपासणी करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.