वसई : शहरातील अनधिकृत बांधकामावर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी पालिकेने बीट चौक्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रभाग सी (चंदनसार) एफ (पेल्हार) आणि जी (वालीव) प्रभागात तीन बीट चौक्या तयार करण्यात आल्या आहेत.वसई, विरार शहरात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असतात. ही बांधकामे होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यामुळे अशा बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी बीट चौक्या तयार करण्याची संकल्पना पुढे आली आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक अनधिकृत बांधकामे होतात अशा प्रभाग सी (चंदनसार) एफ (पेल्हार) आणि जी (वालीव) प्रभागात प्रत्येकी दोन-दोन बीट चौक्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या चौक्यांत तीन पाळय़ांमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एम.एफ.एस) कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.बांधकाम दिसताच तात्काळ कारवाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरून सुरू असलेल्या अवैध बांधकामांचा अहवाल साहाय्यक आयुक्तांना सादर करावयाचा आहे. साहाय्यक आयुक्तांनी चालू बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याबरोबरच बांधकामांना नोटीस देतानाच न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याच्या सूचना आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिल्या आहेत. या चौक्यांना प्रभाग अधिकारी रोज भेट देणार असून विभागीय उपायुक्त एक दिवसाआड तर उपायुक्त (अतिक्रमण) आठवडय़ातून दोनदा व अतिरिक्त आयुक्त आठवडय़ातून एकदा भेट देणार आहेत.

अनधिकृत बांधकामे होऊ नयेत यावर देखरेख ठेवण्याचे काम या बीट चौकीतील कर्मचाऱ्यांना करायचे आहे. अनधिकृत बांधकामे होतांना आढळल्यास बीट चौकीतील कर्मचारी प्रभाग अधिकाऱ्यांना कळवतील आणि अतिक्रमणविरोधात कारवाई केली जाणार आहे. -अजित मुठे, उपायुक्त (अतिक्रमण)