वसई: वसई विरार शहरातील तरणतलाव धोकादायक ठरू लागल्स आहेत.मंगळवारी सायंकाळी विरार (पश्चिम) येथील यशवंत नगर भागातील अमय क्लब स्विमिंग पूल मध्ये साडेतीन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ध्रुव बिष्ट असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

विरार पश्चिम येथील यशवंत नगर साधे अमेय क्लासिक क्लब आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरार मध्ये राहणारा ध्रुव बिष्ट (वय साडेतीन वर्षे) हा मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या आईसोबत अमय क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये गेला होता.पोहत असताना त्याच्या नाकात आणि तोंडात पाणी गेले आणि त्याचा श्वास अडकल्याने तो बुडू लागला.

पूलवरील गार्डने त्याला तत्काळ बाहेर काढले, पण त्याला उलट्या होऊ लागल्या. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी बोळिंज पोलिसांनी अपघाती मृत्यू (ADR) म्हणून नोंद घेत तपास सुरू केला आहे. घटनेनंतर स्विमिंग पूलमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

यापूर्वी घडलेल्या घटना

२० एप्रिल २०२५ रोजी मिरा भाईंदर मध्ये क्रीडा संकुलातील तरण तलावात बुडून ग्रंथ मुथा ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.

२२ मे २०२५ विरार अर्नाळा येथील ड्रिमलॅण्ड रिसॉर्टमध्ये मुंबई गोरेगाव येथून कुटुंबासोबत सहलीसाठी आलेल्या दिशांत हरिजन या ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.