सुहास बिर्‍हाडे

वसई- इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक इस्त्रायली ज्यू नागरिक पेटून उठला आहे. प्रत्येक घरातून सरासरी एक तरुण या युध्दासाठी रवाना झाला आहे. या नरसंहारामुळे आम्ही दु:खात आहोत, हे आमच्या प्रत्येकावरील संकट आहे. पण आम्ही शेवटपर्यंत लढू आणि जिंकू असा निर्धार इस्त्रायली नागरिकांनी व्यक्त केला आहे.

इस्त्रायलच्या गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यामुळे जग हादरलं आहे. दोन्ही बाजूने प्रतिहल्ले होत आहे. संपूर्ण देशात भीषण परिस्थिती उद्भवली आहे. आता सावरलेला प्रत्येक इस्त्रायली ज्यू या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज झाला आहे. आम्हाला कुणाची मदत नको आम्ही एकटे लढण्यासाठी समर्थ आहोत, असे इस्त्रायली राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येक इस्त्रायली कुटुंबातील एक जण युध्दासाठी रवाना झाला आहे. काही कुटुंबातील २ ते ३ जण युध्दासाठी गेले आहेत. या हल्ल्यामुळे आम्ही बिथरणार नाही. आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ असे इस्त्राएलच्या डिमोरा शहरात राहणार्‍या अवराहम या ज्यू इस्त्रायली नागरिकाने लोकसत्ताला दूरध्वनीद्वारे सांगितले. अवराहम हे सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांना युध्दात जाता आले नाही. पण त्यांचा तरुण मुलगा लिओ लष्करात आहे. त्यांच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले असून जावई आदिराम आणि पुतण्या एरल हे युध्दासाठी रवाना झाले आहेत.

आणखी वाचा-“शत्रूशी लढण्यासाठी सर्व ताकद वापरू”, नेतान्याहूंचा हमासला थेट इशारा; म्हणाले, “ही फक्त…”

डिमोरा शहर हे गाझा पट्टीपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे. या शहरातील लोकसंख्या ३० हजारांहून अधिक आहे. युध्दामुळे शहरातील जनजीवन ठप्प झाले आहे. रस्त्यावर शुकशुकाट असून गाड्यांच्या लांबच लांब रागा आहेत. शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत. आवश्यकता असेल तर घराच्या बाहेर पडा असे नागरिकांना सांगण्यात आले आहे. इस्त्रायली ज्यू नागरिक लढणार्‍या सैनिकांसाठी प्रार्थना करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नरसंहारामुळे संपूर्ण इस्त्रायल देश शोकसागरात बुडाला आहे. हे आमच्या प्रत्येकावरील संकट आहे. आम्ही दु:खात आहोत असे अवराहम यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. शनिवारी धार्मिक सण होता. हजारो तरुण तरुणी सणाच्या आनंदात होते. तेव्हा हा हल्ला झाला. या हल्ल्याची भीषणता सांगताना, आपल्या नागरिकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल बोलतांना अवराहम यांना रडू कोसळले. त्यांनी केलेला हल्ला हे युध्द नाही तर अमानुष विकृती आहे अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सर्वत्र अस्थिर आणि अनिश्चितचेची परिस्थिती आहे. काहीही विपरीत घडू शकतं असं त्यांनी सांगितले. मात्र आम्ही शेवटपर्यंत लढू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-“इस्रायलनं गाझावर जमिनीवरील हल्ले केल्यास…”, व्लादिमीर पुतिन यांचा इशारा

अवराहम नागावकर यांची आजी दुसर्‍या महायुध्दाच्या दरम्यान भारतात आली होती. तेव्हापासून ते कुटुंबिय मुंबईत रहात होते. १९६८ साली ते इस्रायल देशात परत गेले. त्यांची बहिण आजही वसईत आहे. त्यामुळे अवराहम कुटुंबिय मराठी भाषा बोलतात.