वसई: श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी वसई-विरार परिसरात शिवभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. पहाटेपासूनच ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. सकाळपासूनच शहरातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती.
श्रावणी सोमवारचे औचित्य साधून वसईतील प्रसिद्ध तुंगारेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, नालासोपाऱ्यातील चक्रेश्वर महादेव मंदिर, विरारमधील आत्मलिंगेश्वर महादेव मंदिर, निर्मळ येथील आगाशी येथील पेशवेकालीन भवानी शंकर मंदिर अशा प्रमुख शिवमंदिरांसह स्थानिक लहान-मोठ्या मंदिरांमध्येही भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच मुंबई, ठाणे आणि वसई-विरार भागातून आलेल्या भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या.अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाची आणि वाहतुकीच्या साधनांच्या अभावाची पर्वा न करता, शिवभक्तांनी तासन्तास रांगेत उभे राहून शंकराचे दर्शन घेतले.
‘हर हर महादेव’ च्या घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मंदिरांच्या आसपासच्या परिसरात फुलविक्रेते, पूजेचे सामान, मिठाई आणि इतर प्रसादाचे स्टॉल लावल्याने एक वेगळीच लगबग आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. शिवभक्तांच्या उत्साहाने हा परिसर गजबजून गेला होता.
माणिकपूरमधून निघाली ‘कावड यात्रा’
उत्तर भारतात श्रावण महिन्यात मोठ्या उत्साहात काढली जाणारी ‘कावड यात्रा’ यंदा वसईतही अनुभवायला मिळाली. माणिकपूर येथून कावड यात्रा काढण्यात आली. शिवभक्त पवित्र नदीतून पाणी भरून घेऊन ते शंकराच्या मंदिरांमध्ये शिवलिंगावर अर्पण करतात. याच परंपरेनुसार, माणिकपूरमधील अनेक शिवभक्त मोठ्या उत्साहाने कावड घेऊन निघाले होते, ज्यामुळे श्रावणी सोमवाराच्या उत्साहात आणखी भर पडली.