वसई: वसईतील अनेक ठिकाणी, विशेषतः वर्दळीच्या भागांत, पुन्हा एकदा उघड्या वीजपेट्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या उघड्या वीजपेट्यांमधून बाहेर आलेल्या तारा आणि त्यातून होणारा विद्युत प्रवाह यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

वसई-विरारमध्ये महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. याकरिता महावितरणने विविध ठिकाणी वीज पेट्या (डीपी बॉक्स) बसविल्या आहेत. यापैकी अनेक पेट्या मुख्य रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी आहेत. काही ठिकाणी या पेट्यांचे दरवाजे तुटले असल्याने त्या उघड्या आहेत, ज्यामुळे विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याची भीती आहे.

वसई पश्चिमेकडील पापडी, माणिकपूर, स्टेला, तर वसई पूर्वेकडील चिंचोटी मार्ग, तुंगारेश्वर, रेंग ऑफिस यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी उघड्या वीजपेट्या सर्रास दिसत आहेत. हे भाग मुख्य रस्त्यांना जोडलेले असल्यामुळे येथे वाहनचालक, शाळकरी मुले आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. विशेषतः पावसाळ्यात या उघड्या वीजपेट्यांमुळे विजेचा धक्का लागून दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक वाढते.

वसई-विरार परिसरात यापूर्वीही विजेचा धक्का लागून अनेक दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असूनही परिस्थिती सुधारलेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. “कुणाच्या जीवावर बेतल्यावरच कारवाई होणार का?” असा संतप्त सवालही स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन, या धोकादायक वीजपेट्यांची दुरुस्ती करावी किंवा त्या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत. उघड्या वीज पेट्या बंदिस्त करण्याचे काम सातत्याने सुरूच आहे. जिथे उघड्या असतील त्या बंदिस्त करण्याच्या संदर्भात संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील असे महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.