शहरातील सुकलेली झाडे धोकादायक; वसईच्या चिमाची अप्पा मैदनातील काही वृक्ष सुकले

वसई-विरार शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली सुकलेली झाडे ही धोकादायक ठरू लागली आहेत.

शहरातील सुकलेली झाडे धोकादायक
( प्रतिनिधिक छायाचित्र )

वसई : वसई-विरार शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली सुकलेली झाडे ही धोकादायक ठरू लागली आहेत. ही झाडे वादळी वाऱ्यात कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुकलेल्या वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वसई-विरार शहरांतील विविध ठिकाणच्या भागांत व रस्त्याच्या कडेला विविध प्रकारचे वृक्ष आहेत. हे वृक्ष खऱ्या अर्थाने वसईच्या निसर्गसौंदर्यात भर टाकतात. मात्र काही ठिकाणी हे जुने झाल्याने वृक्ष व त्यांच्या फांद्या या सुकलेल्या स्थितीत आहेत; परंतु असे वृक्ष हटविण्याकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जाऊ लागले आहे.

वसई पश्चिमेच्या चिमाजी अप्पा मैदानाजवळच्या भागातही अशाच प्रकारे एक वृक्ष सुकून गेले आहे. या ठिकाणी दररोज मोठय़ा संख्येने ज्येष्ठ नागरिक, मुले फेरफटका मारण्यासाठी येत असतात, तर काही जण याच रस्त्याच्या कडेने प्रवासही करतात. हे सुकलेले झाड कोसळले तर मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सुकलेले वृक्ष वाहनचालक व पादचारी नागरिक यांच्यासाठी जीवघेणे ठरू शकतात. २०१९ मध्ये वसई पूर्वेच्या वसंत नगरी भागात २६ वर्षीय तरुणाच्या अंगावर सुकलेले झाड कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी आधीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने पावसाळय़ापूर्वी धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची पाहणी करून त्यांची छाटणी करण्याचे काम सुरू केले होते. मात्र अजूनही काही ठिकाणी धोकादायक अवस्थेत असलेले वृक्ष आहेत. यासाठी पालिकेने शहरातील धोकादायक व सुकलेल्या स्थितीत असलेल्या वृक्षांची पाहणी करून त्यांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dangerous trees city dangerous some trees chimachi appa ground vasai have dried amy

Next Story
बेकायदा बांधकामांवर सुट्टीतही कारवाई ; दीड वर्षांत १७ लाख चौरस फूट बांधकामे जमीनदोस्त
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी