स्वस्तात घरे, सुविधा देण्याचे आमिष
प्रसेनजीत इंगळे
विरार : शहरात पुन्हा चाळमाफियांनी आपली दुकाने थाटत नागरिकांना स्वस्त आणि सुलभ हप्तय़ात घरे देण्याचे सांगून त्यात पालिकेचे पाणी, वीज मीटर, नोंदणी आणि घरपट्टी दिली जाणार असल्याचे सांगत त्यांची फसवणूक करत आहेत. सन २०१८ मध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्रलोभने देऊन हजारो चाळी भूमाफियांनी विकल्या होत्या. त्यावर पालिकेने कारवाई केली असता हजारो कुटुंबे रस्त्यावर आली होती. ती अजूनही आपल्या निवाऱ्यासाठी झटत आहेत.
वसई पूर्व राजावली,सातिवली, भोयादापाडा या परिसरात खासगी आणि शासकीय जागांवर शेकडो चाळी बांधण्याचे काम सुरु आहे. ह्या चाळी विकण्यासाठी वसई पूर्व रेल्वे स्थानकाच्या जवळ ३० ते ४० व्यावसायिकांनी आपली कार्यालये सुरु केली आहेत. हे चाळमाफिया पत्रके, युटय़ूब, आणि इतर समाजमाध्यमांचा वापर करून ग्राहकांचा शोध घेत आहेत. मुंबई आणि आसपासच्या परिसारत राहणारे गोरगरीब, उत्तर प्रदेश, बिहार, कोकणातील स्थलांतरित मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना जाळय़ात ओढत आहेत. विकासक ग्राहकांना ३ ते १० लाखाचे घर, गाळे कोणतेही बँकेचे कर्ज न घेता २ ते ८ हजाराचे हप्ते लावून देत आहेत. यात ग्राहकांनी असेल तितक्या रुपयात नोंदणी करून घर दिले जाते आणि दर महिन्याला त्यांच्याकडून हप्ते वसूल केले जातात. अशा पद्धतीने शेकडो चाळी या परिसरात उभ्या राहत आहेत.
सन २०१८ मध्ये महापालिकेने आणि वन विभागाने याच परिसरात तोडक कारवाई करत १५०० हून अधिक चाळी तोडल्या होत्या. यावेळी पालिकेच्या पथकावर हल्ले सुध्दा चढविण्यात आले होते. यात हाजारो कुटुंब बेघर झाले होते. ते आजही आपल्या विकासकाचा शोध घेत असून प्रशासनाच्या दरबारी उबराठे झिजवत आहेत. या प्रकरणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. नंतर पालिकेने याठिकाणी कोणतेही अनधिकृत बांधकाम होऊ दिले नाही. परंतु काळ लोटल्याने पुन्हा या ठिकाणी अनधिकृत बांधकामे जोर धरू लागली आहेत. यात पालिकेचे साटेलोटे असल्याचा आरोप केला जात आहे.सध्या मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहताना पालिका मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. यामुळे पुन्हा हजारो कुटुंबाचे भवितव्य धोक्यात आले आहे. दरम्यान गौरव बिल्डर आणि डेव्हलपर्स या नावाने एक विकासक अशा पद्धतीने अनधिकृत चाळी बांधून माफक हप्तय़ात नागरिकांना घरे, गाळे विकत आहे, असे सांगितले जात आहे.
या प्रकरणी जातीने चौकशी करून अशा अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून तातडीने कारवाई केली जाईल, तरी नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. पालिकेची परवानगी असल्याची खात्री करूनच घर विकत घ्यावे
-आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई विरार महानगरपालिका