लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई– इन्स्टाग्रामवरून १२ वर्षीय  मुलीला अश्लील छायाचित्रांच्या आधारे ‘ब्लॅकमेल’ करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हे शाखेने याप्रकरणी मीरा रोड येथून तौसिफ खान (२१) या तरुणाला अटक केली आहे. या आरोपीने मुलीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून पीडित मुलीशी मैत्री करून तिच्याकडून अश्लील छायाचित्रे मागवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीरा रोड येथे राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीला इन्स्टाग्रामवर रिया नावाच्या मुलीची विनंती (रिक्वेस्ट) आली होती. या रिया नावाच्या मुलीने तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्याकडून अश्लील छायाचित्रे मागवली. नंतर याच अश्लील छायाचित्राच्या आधारे तिला वारंवार धमकावून अश्लील चित्रफिती मागविण्यास सुरुवात केली. अखेर या मुलीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ इन्स्टाग्राम कंपनीशी संपर्क केला आणि हा प्रकार मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी (चाइल्ड पोर्नोग्राफी) असल्याने तात्काळ माहिती मागवली. त्यानुसार आरोपीचा आयपी अ‍ॅड्रेस आणि मोबाइल क्रमांक मिळवला. सदर आरोपी मुलगी नसून तौफिक खान (२१) नावाचा तरुण असल्याचे समजले. सायबर पोलिसांनी मीरा रोड येथून तौसिफला अटक केली. हा आरोपी एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. आरोपी तरुण मुलींच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाती उघडायचा आणि अल्पवयीन मुलींशी मैत्री करायचा. त्यांची अश्लील छायाचित्रे मागवून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करायचा अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांनी दिली. आरोपीवर  पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.