वसई:- वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर मंगळवार सकाळपासून सक्तवसुली संचलनालयाची कारवाई सुरू झाली आहे. वसईच्या दिनदयाळ नगर येथील शासकीय बंगल्यात तसेच अन्य १२ ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. मागील ६ तासांपासून ही कारवाई सुरू आहे.

अनिलकुमार पवार हे जानेवारी २०२२ पासून वसई विरार महापालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ठाणे येथे बदली झाली होती. बदलीनंतरही ते आठवडाभर पालिकेत कार्यरत होते.
सोमवारी त्यांचा महापालिकेच्या मुख्यालयात छोटेखानी निरोप समारंभ पार पडला होता. मात्र या निरोप समारंभाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली आहे. त्यांच्या वसईतील दिनदयाळ नगर येथील शासकीय बंगला तसेच मुंबई, नाशिक मधील मधील १२ ठिकाणांवर कारवाई सुरू आहे. खुद्द पालिकेचे माजी आयुक्तच ईडीच्या रडारवर आल्याने वसईत खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

मे महिन्यापासू ईडीच्या कारवाईचे सत्र सुरू आहे. पालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैद्राबाद येथील निवासस्थानी छापे टाकून कोट्यवंधींचे घबाड जप्त करण्यात आले होते. त्यापाठोपाठ बडे व्यावसायिक, सनदी लेखापाला, वास्तुविषारद आदींवर कारवाई झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.