वसई: वसई विरार शहरात शासकीय रुग्णालये, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत, महापालिका,शाळा, सार्वजनिक सेवा अशा शासकीय आस्थापनांनी महावितरणचे सुमारे साडे आठ कोटी रुपयांचे वीज देयक थकीत ठेवले आहे. याचा आर्थिक फटका महावितरणला बसू लागला आहे. वसई विरार मध्ये  वसई मंडळाच्या अंतर्गत वीज पुरवठा केला जातो.यात सर्वसामान्य वीज ग्राहकांसह शहरातील शासकीय रुग्णालये, पोलीस ठाणे, शाळा, महापालिकेच्या ग्रामपंचायतिच्या पाणी पुरवठा व पथदिवे यासारख्या सार्वजनिक सेवा, इतर शासकीय आस्थापनांना महावितरणकडून वीज पुरवठा केला जात आहे.मात्र या शासकीय आस्थापना व सार्वजनिक सेवा यांनी महावितरणचे वीज देयक भरले नसल्याने महावितरणने वीज देयक थकीत राहिले आहे.

सध्या मार्च अखेर सुरू असल्याने महावितरणने थकित वीज देयके वसुली करण्यास सुरुवात केली आहे.ज्यांची मोठ्या प्रमाणात वीज देयके थकीत आहेत त्यांचा वीज पुरवठा करण्याची मोहीम ही सुरू करण्यात आली आहे.वसई मंडळात महावितरणची  ४४  कोटींची थकबाकी आहे. त्यातील साडे आठ कोटी रुपये ही रक्कम शासकीय आस्थापना व सार्वजनिक सेवा यांची आहे अशी माहिती महावितरणने दिली आहे. यात शासकीय व सार्वजनिक सेवेतील ४५ पोलीस ठाणी, २३९ शाळा, २६ रुग्णालये, २२१ महापालिका पाणीपुरवठा, ८०० पालिका पथदिवे, २५ ग्रामपंचायत पाणीपुरवठा, ८० ग्रामपंचायत पथदिवे, ५९० इतर अशा एकूण २ हजार २६  ग्राहकांकडे ८ कोटी ४८ लाख रुपये इतकी वीज देयकाची रक्कम थकीत आहे.  वीज देयकांची मोठ्या प्रमाणात रक्कम थकीत असल्याने याचा आर्थिक फटका महावितरणला बसू लागला आहे. त्यामुळे ही थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महावितरण पुढे उभे राहिले आहे.

हेही वाचा >>>वरिष्ठांनी कानउघडणी केल्यानंतर स्थानिक नेते नरमले; मिरा भाईंदर मध्ये महायुती एकत्रित काम करणार

वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा

वीज देयक भरून महावितरणला सहकार्य करावे अशा सूचना या शासकीय विभागाला करण्यात आल्या आहेत. मात्र वीज देयक भरण्यास पुढे न आल्याने महावितरणची मोठी रक्कम थकीत राहणार आहे. त्यामुळे वीज देयके न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा महावितरणने दिला आहे.

हेही वाचा >>>भाजपाचे घूमजाव, गावित यांच्या उमेदवारीला विरोध नसल्याचे स्पष्ट

अशी आहे थकबाकी रक्कम

पोलीस ठाणे-  २२ लाख ४६ हजार

शाळा – २८ लाख ६६ हजार

रुग्णालये – २ लाख ८९ हजार

महापालिका पाणीपुरवठा- ६९ लाख ९३ हजार

महापालिका पथदिवे- ३ कोटी ८४ लाख

ग्रामपंचायत पाणीपुरवठा – १५ लाख ७३ हजार

ग्रामपंचायत पथदिवे-  १ कोटी ४६ लाख

इतर शासकीय सेवा – १ कोटी ७२ लाख

ग्राहकांची ४४ कोटींची थकबाकी

थकबाकी वसुलीसाठी मुख्य अभियंत्यांसह जनमित्रांपर्यंत सर्वच स्तरावरील अधिकारी, अभियंते व कर्मचारी वाढत्या तापमानातही वसुलीसाठी उतरले आहेत. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील ९२ हजार ४२७ ग्राहकांकडे ४४ कोटी ९५ लाख इतकी वीज देयकांची रक्कम थकीत आहेत. विजदेयके भरत नाहीत त्यांचा वीज पुरवठा आम्ही खंडित करतो असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.