वसई : पालघर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना विरोध केल्यानंतर भाजपाने सारसारव करून घुमजाव केले आहे. गावित यांना विरोध केल्याचे पत्र शहर अध्यक्षाने उत्साहात काढले असून ती त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे भाजपाने बुधवारी स्पष्ट केले. महायुती मधील पालघर लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपाने या मतदारसंघाची मागणी केली आहे तर शिंदे गटाने या जागेवर दावा सांगितला आहे.

सध्या विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. भाजपचे वसई शहर मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर यांनी २२ मार्च रोजी पक्षाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना पत्र लिहून गावित यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. गावित यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असून ते अकार्यक्षम आहेत. गावित यांना उमेदवारी दिली तर पराभव होईल, असे या पत्रात म्हटले होते. यामुळे महायुतीमधील बेबनाव समोर आला होता. या पत्रामुळे शिंदे गटाने तीव्र हरकत घेऊन संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा : भाईंदर : माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सांच्या भूमिकेकडे लक्ष, महायुती व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच

भाजपाचे घूमजाव, महायुतीत वाद नसल्याचा दावा

भाजपाचे वसई शहर मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर यांनी अतिउत्साहात गावितांना विरोध केला आहे. मात्र ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून भाजपची तशी भूमिका नसल्याचे पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख मनोज बारोट यांनी स्पष्ट केले आहे. पालघर लोकसभेसाठी कोणतेही चिन्ह व उमेदवार जाहीर केला तरी प्रत्येक भाजप कार्यकर्ता आपला उमेदवार नरेंद्र मोदी असल्याचे मानून काम करेल असेही बारोट यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : वसई विरार महापालिकेत ४ नवीन उपायुक्त, अतिरिक्त आयुक्तपदी संजय हेरवाडे यांची पुन्हा नियुक्ती

भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनीही महेश सरवणकर यांच्या भूमिकेचे खंडण केले आहे. भाजप नेहमी युती धर्माचे पालन करतो. भाजपच्या श्रेष्ठ नेतृत्वाकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे भाजप जिल्हाध्यक्ष ते बूथ स्तरावरील कार्यकर्ते काम करतात. आमच्या महायुतीत कुठलाही बेबनवा नाही. त्यामुळे पक्ष जो उमेदवार देईल त्याला महायुतीचे कार्यकर्ते दिल्लीला पाठवतील असा विश्वास पालघर लोकसभा मित्र पक्ष समन्वयक राजन नाईक व भाजपा वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.