भाईंदर- मिरा भाईंदर शहरातील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामधील वाट तूर्तास मिटला आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांची कानउधडणी करून एकत्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मतभेद विसरून आता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मिरा भाईंदर शिवसेना (शिंदे) आणि भाजपा या महायुतीमधील घटकपक्षांचे वद विकोपाला गेले होते. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील वादामुळे हा संघर्ष पेटला आहे. प्रताप सरनाईक यांच्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचा मेहता यांचा आरोप आहे. तेव्हापासून दोघामध्ये कटुता आहे. काही दिवसापूर्वी भाजपाचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी आमदार प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप केल्यानंतर या दोघांमधील वादास पुन्हा तोंड फुटले होते. नरेंद्र मेहता यांनी देखील ही संधी साधत संपूर्ण भाजप पक्षाला सरनाईकांविरोधात उभे केले होते. दोघांमधील हा वाद इतका शेगेला पोहचला की भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षाच्या  जिल्हाध्यक्षांनी पोलीस ठाण्यात पत्र देऊन एकमेकांविरोधात कारवाईची मागणी केली. इतकेच नव्हे तर लोकसभेसाठी शिवसेनेचा उमदेवार उभा राहिल्या प्रचार करणार नसल्याचा थेट इशारा  भाजपने दिला होता.

हेही वाचा >>>भाईंदर : माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सांच्या भूमिकेकडे लक्ष, महायुती व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच

येत्या दिवसातच ठाणे लोकसभेसाठी  महायुतीचा उमदेवार घोषित केला जाणार आहे. अशा स्थितीत मिरा भाईंदर मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू राहिल्यास त्याचे पडसाद इतर ठिकाणी देखील उमटून या वादाचा फायदा महाविकास आघाडीचे उमदेवार राजन विचारे यांना होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी पुढाकार घेतला आणि वाद मिटवून एकत्र कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते नरमले आहे.

याबाबत जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांना विचारणा केली असता ते कोणत्याही परिस्थितीत युतीधर्म पाळणार असल्याचे  सांगितले. महायुतीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भाजपासोबत एकत्रित काम  करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय एखादा कार्यकर्ता यात नाराज असल्यास  तो त्याचा व्यक्तीगत निर्णय असू शकतो. दोन्ही पक्ष एकत्रित प्रचार करणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी दिली आहे.