भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरून खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना केलेल्या तक्रारीची चित्रफीत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

भाईंदरमध्ये नव्याने उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी मिरा भाईंदर शहरात आले होते. शिंदेच्या स्वागतासाठी शिवसेना तसेच महापालिका प्रशासनाने मोठी तयारी केली होती. याच कलादालनाच्या आसपासचा परिसर स्वच्छ करून रस्ते दुरुस्ती व इतर काम यावेळी करण्यात आली होती.

मात्र, घटनास्थळी पोहोचताच गाडीतून उतरताच शिंदे यांनी शहरात पडलेल्या खड्ड्यांबाबत मिरा भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्यापुढे नाराजी व्यक्त केली.

मिरा भाईंदर शहरात सुरू असणारी विकासकामे तसेच पावसाळ्यामुळे रखडलेली रस्त्याची दुरुस्ती यामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती. तर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम प्रशासनाने महिनाभरापूर्वीच हाती घेतले होते. मात्र पावसाच्या आगमनामुळे या मार्गांवर पुन्हा खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तर अंतर्गत डांबरी रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. यात हाटकेश, गोविंदनगर, हैदरी चौक, जे. पी. रोड आणि फाटक रोड यांचा समावेश आहे.

व्हायरल झालेल्या चित्रफितीमध्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट आयुक्त शर्मा यांची कान उघडणी करताना दिसत आहेत. “रस्त्याच्या एका बाजूचे खड्डे दुरुस्त केले आहेत आणि दुसऱ्या बाजूचे खड्डे मात्र दुरुस्त केलेले नाहीत,” असे म्हणत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपला प्रवासही अडचणीचा झाला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

यावर आयुक्त शर्मा यांनी शहरात खड्डे भरण्याचे काम करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, शिंदे यांनी लगेचच आक्षेप घेत, “रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, भरलेल्या खड्ड्यांवर वाहनांचा प्रवास झाल्यामुळे ते देखील आता एकसमान राहिलेले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे”, असे स्पष्टपणे सुनावले.

ही घटना शिंदेच्या स्वागतासाठी उभे असलेल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यानंतर ही चित्रफित समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काही दिवसापूर्वीच मिरा भाईंदर शहरातील खड्ड्याबाबत लोकसत्ता वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर शहरातील खड्डे भरणार असल्याचा दावा देखील प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या संतापामुळे मिरा भाईंदरमध्ये रस्ते दुरुस्तीचे काम रखडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.