वसई : वसई रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी उद्वाहक लावण्यात आले आहेत मात्र यातील काही उद्वाहक अस्वच्छ झाले आहेत. पानाच्या पिचकाऱ्या, तंबाखू गुटख्याची पाकीटं, अर्धवट पिऊन टाकलेल्या बिडी आणि सिगारेटींमुळे उद्वाहकात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे.

वसई स्थानकात पूर्व आणि पश्चिम असे मिळून एकूण चार उद्वाहक आहेत. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाणारे बहुतांश नागरिक पायऱ्या आणि स्वयंचलित जिन्यांच्या तुलनेत उद्वाहकाचा वापर करणे पसंत करतात. तसेच स्थानकातुन प्रवास करणारे वृद्ध, अपंग आणि गर्भवती महिलांसाठी उद्वाहक अतिशय महत्त्वाचे ठरतात. मात्र, गेल्याचे काही काळात उद्वाहकात निर्माण झालेल्या अस्वछतेमुळे नागरिकांसाठी उद्वाहक वापरणे अतिशय कठीण होऊन बसले आहे.

उद्वाहकांच्या प्रत्येक कोपऱ्यात पानाच्या पिचकाऱ्या आणि गुटख्याची पाकिटे पडलेली दिसतात. तसेच, काही उद्वाहकांमध्ये अर्धवट ओढलेल्या बिड्या आणि सिगारेटीचे तुकडेही फेकलेले आढळतात. विशेषतः पावसाळ्यात हा कचरा कुजून दुर्गंधी अधिकच वाढली आहे. यामुळे उद्वाहकातील हवा दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.