वसई : वसई विरार महापालिकेच्या स्थापनेनंतर १५ वर्षानंतर प्रथमच पालिकेच्या रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांची स्वच्छता करण्यात आली. शनिवारी सर्व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर रुग्णालये आणि आरोग्यकेंद्राची साफसफाई करणे, भंगार साहित्य काढणे, अडगळीच्या जागा मोकळ्या करणे आदी कामे करण्यात आली.

वसई विरार महापालिकेची स्थापना जुलै २००९ साली झाली. महापालिकेची एकूण ७ रुग्णालये तसेच २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या रुग्णालयांची आजवर स्वच्छता करण्यात आली नव्हती. सर्वत्र भंगार साहित्य पडलेले होते. न वापरलेली उपकरणे, साहित्य अडगळीत पडले होते. त्याचा मोठा ई कचरा जमा झाला होता. कागदपत्रांच्या रद्दीचे ढिगच्या ढिग साचले होते. दैनंदिन स्वच्छता वरवर करण्यात येत होती.पंखे देखील कधी पुसण्यात आले होते. सर्वत्र जळमटं साचली होती. यामुळे रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे बकाल बनून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी पाहणी केल्यानंतर ही दुरवस्था आढळली. ताबडतोब त्यांनी सर्व संबंधित रुग्णालयाचे प्रमुख, वैद्यकीय अधिकार्‍यांना रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेचे आदेश दिले. ही स्वच्छता मोहीम लवकरात लवकर घेण्याचे आदेश देताना मी कुठल्याही क्षणी पाहणी करेन आणि स्वच्छता न दिसल्यास कारवाई केली जाईल असा सज्जड दमच दिला होता. सोमवार ते शुक्रवार हा कामाचा व्यस्त दिवस असतो. त्यामुळे शनिवारचा दिवस साफसफाईसाठी निवडण्यात आला.

सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी या मेगा स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते. सर्व ७ रुग्णालये आणि २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच वेळी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंखे, खिडक्या पुसण्यात आल्या. जमीनी, परिसर, जीने धुण्यात आले. जळमटे काढण्यात आली. अडगळीत पडलेले साहित्य, न वापरेलेली उपकरणे, रद्दी पेपर्स, जुन्या फाईली आदी काढण्यात आल्या. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण येत असतात. त्यांना चांगली सेवा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. रुग्णालयाचा परिसर स्वच्छ असावा, दुर्गंधी येऊ नये, प्रसन्नता वाटावी यासाठी ही मोहीम घेण्यात आली होती, असे वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक संजय हेरवाडे यांनी सांगितले.