लोकसत्ता प्रतिनिधी 

वसई : वसई आगारातून लांब पल्ल्याच्या प्रवासाठी खिळखिळ्या व जुन्या झालेल्या बसेस सोडल्या जात होत्या. त्याचा प्रवाशांना फटका बसत होता. यासाठी वसई आगारात लांब पल्ल्याच्या प्रवासाठी पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. गुरुवारी त्याचे वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते लोकार्पण करून सेवेसाठी सुरू केल्या आहेत.

वसईत एसटी महामंडळाचे आगार आहे.या आगारातून वसई विरार, ठाणे, मुंबई, यासह धुळे , जामखेड, आंबेजोगाई, रत्नागिरी, शहादा,अमळनेर, पाचोरा, पंढरपूर, कोल्हापूर,नगर, नाशिक, वाशीम, शिर्डी,औरंगाबाद, लातूर,जळगाव, जेजुरी अशा विविध लांब पल्ल्याच्या ठिकाणी सेवा पुरविली जाते.

दिवसाला या आगारातून १५१ इतक्या एसटी बसेस सेवेचया फेऱ्या होत आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या  प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या एसटी गाड्या फारच जुन्या झाल्या होत्या.काही बस तर अक्षरशः खीळखिळ्या झाल्या होत्या त्यामुळे यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा त्रास सहन करावा लागत होता. यासाठी नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे करण्यात आली होती.

सद्यस्थितीत वसई आगारात ५ नवीन एसटी बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या एसटीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या हस्ते पार पडला. यावेळी एसटी महामंडळाचे पालघर विभाग नियंत्रक कैलास पाटील, वसई आगार प्रमुख व वसईतील नागरिक उपस्थित होते. या ५ नवीन एसटी गाड्या ४० प्रवासी आसन व्यवस्था असलेल्या असून या लातूर,अंबाजोगाई, भुसावळ, म्हसवड , रत्नागिरी या लांब पल्ल्याच्या मार्गावर चालविल्या जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळ विभागाकडून देण्यात आली आहे. वसईत एसटी बसची संख्या ४० होती ती आता ४५ इतकी झाली आहे.

वसई विरार मधील नागरिकांना चांगली बस सुविधा मिळावी यासाठी राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरूच आहे. पहिल्या टप्प्यात वसईला पाच गाड्या दिल्या आहेत. आणखीन नवीन बस उपलब्ध कशा होतील यासाठी माझा प्रयत्न आहे. -स्नेहा दुबे-पंडित, आमदार वसई

पालघर जिल्ह्यातील आगारासाठी १२० नवीन बसेस मागणी केली होती. आता २० बसेस आल्या असून त्यातील वसईच्या आगारात ५ बस दिल्या आहेत. प्रवाशांना वेळेत व चांगला सुविधा कशी पुरवता येईल यावर आमचा भर आहे. -कैलास पाटील, विभाग नियंत्रक पालघर एसटी महामंडळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांना दिलासा

आजही अनेक नागरिक एसटी सेवेला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे.  जुन्या व खीळखिळ्या झालेल्या बसेस सतत नादुरुस्त होत होत्या.प्रवासातच बसेस बंद पडतात. त्यामुळे पुढील प्रवासासाठी दुसरी बस येईपर्यंत किंवा ती दुरूस्त होईपर्यंत प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत होते. आता नवीन बस उपलब्ध झाल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे सुस्थितीत असलेल्या बसेस असल्याने एसटीचालक व वाहक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.