वसई:- वसई परिमंडळ २ ला अत्याधुनिक अशा स्वरूपाचे न्यायवैद्यक वाहन (फॉरेन्सिक व्हॅन) उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी या वाहनाची मोठी मदत पोलिसांना मिळणार आहे.
सध्या गुन्हेगार अत्याधुनिक पध्दतीचा वापर करून गुन्हे करतात. त्यामुळे गुन्ह्याची उकल करतांना तपास यंत्रणेस अडचणी निर्माण होत असतात. गुन्हा उघडकीस आल्यावरही तपासात संशयितांच्या विरुद्ध पुरावे, शास्त्रीय पध्दतीचा वापर करून पुरावे संकलित न केल्यास गुन्हेगार न्यायालयातून सहज सुटका होते.
असे प्रकार रोखण्यासाठी व सबळ पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यक वाहन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाला राज्य शासनाने नवीन न्यायवैद्यक वाहन उपलब्ध करून दिले आहे.
या वाहनांमुळे पोलीस तपास पथकास गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून घटनास्थळावर आढळून येणारे सुक्ष्म पुरावे जमा करण्यास या वाहनामुळे मदत होणार आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील रासायनिक तसेच जीवशास्त्र विश्लेषण, तांत्रिक विश्लेषण आदी बाबींचा बारकाईने अभ्यास करत तपासकामात मदत होईल. नवीन गुन्हे फौजदारी कायद्या नुसार, ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञांची भेट आवश्यक आहे यासाठी ही या वाहनाचा मोठा फायदा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशी होईल मदत
न्यायवैद्यक वाहनामुळे एखाद्या गुन्ह्यातील पुरावे जलद गतीने आणि अचूकतेने शोधण्यास मदत होणार आहे. यामुळे न्यायालयातील खटल्यांसाठी आवश्यक पुरावे उपलब्ध होणार आहेत. यामुळे गुन्ह्यांची उकल अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. या वाहनामुळे अमली पदार्थ विरोधी कारवाई, सायबर गुन्हे, फसवणूक, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे, हत्या आणि चोरी आदी प्रकरणांमध्ये मदत होणार आहेत.