वसई: गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जनाचे प्रमाण हे वाढल्याचे दिसून आले. यावर्षी दीड दिवसांच्या एकूण १३ हजार ६८२ गणेशमूर्ती विसर्जनापैकी ११ हजार ४४८ गणेशमूर्तींचे विसर्जन हे पालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आले. म्हणजेच एकूण ८३ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले.

यंदाच्या वर्षीही पालिकेने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. विसर्जनासाठी ११६ इतके कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते.

या कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात गणेशमुर्त्या या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आल्या.बाप्पाला निरोप देण्यासाठी वसई-विरार शहरातील अनेक ठिकाणच्या विसर्जनस्थळी मोठी गर्दी केली होती.

यंदाही पालिकेने तलावात होणारे प्रदूषण व तलावांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचे हौद तयार केले होते. त्यातही अनेक नागरिकांनी पुढाकार घेत विसर्जन केले. शहरात दीड दिवसांच्या १३ हजार ६८२ मूर्त्यांचे विसर्जन पार पडले त्यातील ११ हजार ४४८ गणेशमूर्त्या या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आल्या.

त्याचप्रमाणे विसर्जनस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप व्यवस्था, आरती स्थळे, दिवाबत्ती सोय, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य कलश, वैद्यकीय मदत कक्ष आदि आवश्यक सर्व उपाययोजना महापालिकेमार्फत करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी पहाटे सहापर्यंत गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आले. यंदाही दगडखाणीतील विसर्जनासाठी कन्व्हेअर बेल्टची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली होती. कन्व्हेअर बेल्टच्या सहाय्याने विसर्जन करणे अधिक सोयीस्कर ठरले, वेळेची बचत झाली आणि कमी मनुष्यबळात विसर्जन पार पडले.

गणेशभक्तांच्या मदतीसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवक तैनात ठेवण्यात आले होते.  महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्वतः विसर्जनस्थळी भेट देऊन विसर्जनाच्या नियोजनाची पाहणी केली, तसेच दोन्ही अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिकेचे सर्व उप-आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, अग्निशमन कर्मचारी  आणि इतर कर्मचारी वर्ग प्रभागनिहाय विसर्जन स्थळी हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

दिड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन २०२५

कृत्रिम तलाव

घरगुती – ११३९३

सार्वजनिक – ५५

एकूण –  ११४४८ 

नैसर्गिक स्रोत, जेटी

घरगुती – २२०१

सार्वजनिक – ३३

एकूण – २२३४