वसई:- वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी १६० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळामुळे हरकती नोंदविण्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. सण आणि त्यातच कार्यकर्ते गावी गेल्यामुळे अनेकांना प्रभाग रचनेचा अभ्यास करून हरकती नोंदविता आल्या नाहीत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोग आणि शासनाकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले होते. पालिकेने नव्या निर्देशानुसार ४ सदस्यांची प्रभाग रचना केली आहे. यासाठी २०११ च्या लोकसंख्येचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार पालिकेने प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करून प्रसिद्ध केला होता.
या प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती. गणेशोत्सवात अनेकजण व्यस्त असल्यामुळे सुरवातीला हरकतींचा ओघ कमी होता.त्यामुळे सुरवातीच्या १२ ते १३ दिवसात केवळ २३ हरकती नोंदविल्या होत्या आता गौरी-गणपती विसर्जन झाल्याने अनेकांनी वेळ काढून हरकती नोंदविल्या आहेत.
गुरुवार (४ सप्टेंबर ) हा हरकती नोंदविण्याचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात हरकती पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. शेवटच्या दिवशी १३७ हरकती नोंदविण्यात आल्या विशेषतः यात २९ गावांतील दोन हजाराहून अधिक नागरिकांची सामूहिक हरकत ही घेण्यात आली आहेत. पालिकेकडे शेवटच्या दिवसांपर्यँत एकूण १६० हरकतींची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
अशी आहे प्रभाग रचना
आता जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात साधारणपणे ४० ते ४५ हजार इतकी लोकसंख्या असणार आहे. यात २८ प्रभाग हे ४ सदस्यांचे तर एक प्रभाग हा तीन सदस्यांचा असणार आहे. २९ प्रभागात ११५ नगरसेवकांसाठी वसई विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे. घेण्यात आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर नंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर मतदार याद्या निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती उपायुक्त (निवडणूक) दिपक झिंजाड यांनी दिली.
राजकीय घडामोडींना वेग
वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २०२० च्या जुलै महिन्यात संपुष्टात आली होती. मात्र करोनाच्या संकटामुळे निवडणूक लांबणीवर पडली. पाच वर्षांनंतर निवडणूका होणार असल्याने राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे