वसई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महानगरपालिका यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी शहरातील विसर्जनस्थळांची पाहणी करून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे मोठ्या संख्येने आगमन होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेने यासाठी विशेष उपाययोजना केल्या असून, शहराच्या ९ प्रभागांत एकूण ९९ कृत्रिम तलाव आणि फिरते तलाव उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
गतवर्षी एकूण विसर्जनांपैकी ५८ टक्के मूर्तींचे विसर्जन महापालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये झाले होते. यावर्षीही हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विसर्जनस्थळी कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्रे, वैद्यकीय मदत कक्ष, आरती स्थळे, निर्माल्य कलश आणि पुरेशी दिवाबत्तीची सोय करण्यात येणार आहे. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांवरही काम सुरू असल्याचे पालिकेने सांगितले आहे. या पाहणी दौऱ्यावेळी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी विसर्जनस्थळी शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन कसे होईल, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्सालवीस आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.