भाईंदर : मिरा भाईंदर शहरातून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी १ पर्यत २८ टक्के मतदानाची नोंद झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदर शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी गाडीतून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मिरा भाईंदर शहरात सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत ६.१४ टक्के मतदान झाले होते. नंतरच्या दोन तासात वेग वाढला आणि १६ टक्के मतदान झालं. दुपारी १ वाजेपर्यंत २८.३१ टक्के मतदान झाले होते. ठिकठिकाणी मतदानकेंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आलं. मतदारांच्या या प्रतिसादामुळे संध्याकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा – मुस्लिमांबाबत मोदींची भूमिका दुतोंडी – मुजफ्फर हुसेन
मिरा भाईंदर शहर ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे विरुद्ध महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के अशी लढत होत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मानला जात आहे. शहरातून अधिकाअधिक मतदान व्हावे, यासाठी मुख्यमंत्री जागोजाही फिरत आहेत. दुपारी मुख्यमंत्र्यांनी मिरा भाईंदर शहराचा दौरा केला. यावेळी महायुतीच्या केंद्रावर जाऊन त्यांनी कार्यकर्त्याची विचारपूस करून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांचा पराजय समोर दिसून आल्यामुळे मुख्यमंत्र्यांना शहरातील रस्त्यावर फिरावे लागत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे.