भाईंदर : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम समाजाला लक्ष करून धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे राज्यातील मुस्लिम तसेच इतर अल्पसंख्यांकांमध्येच असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोदींची मुस्लिमांसाठी असलेली भूमिका ही दुतोंडी असल्याचे आरोप महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक आमदार मुजफ्फर हुसेन यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वक्तव्याने मुस्लिम समाज दुखावला आहे. मोदी एकीकडे मी हिंदू मुस्लिम वाद करत नाही असे सांगतात आणि दुसरीकडे मुस्लिम समाजावर टीका करतात. मोदींची ही भूमिका दुटप्पीपणाची आहे, असा आरोप माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी केला आहे
हेही वाचा : बहुजन विकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन; पालकमंत्र्यांच्या नोटिशीची खिल्ली, फडणवीसांवर हल्लाबोल
मागील दहा वर्षांत भाजपच्या वागणुकीमुळे मुस्लिम समाज अत्यंत चिडलेला आहे. त्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी व्यापक भूमिका ठेवून मुस्लिम समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते.परंतु मोदी यांनी मुस्लिम समाजाचा वापर राजकारणात तुष्टीकरण करण्यासाठी केला आहे, असे ते म्हणाले. भाजपकडून देशभरात मुस्लिम समाजाविरोधात तेढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापूर्वी केवळ भाजपचे नेते मुस्लिम समाजाविरोधात भाष्य करत होते. मात्र आता खुद्द नरेंद्र मोदीच मुस्लिम समाजाविरोधात भूमिका मांडत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे, असे हुसेन यांनी सांगितले.
हेही वाचा : पालकमंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
शरीयतबाबत अपप्रचार करण्याचा प्रयत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देशातील विविध धर्माना आपल्या पारंपरिक पद्धतीने धर्माचे पालन करण्यासाठी विशेष अधिकार दिले आहेत. त्यानुसार मुस्लिम समाज शरीयत कायद्या अंतर्गत नियमांचे पालन करत आहे. या कायद्याबाबत देशातील हिंदू बांधवाना फारशी माहिती नाही. त्यामुळे भाजप कडून या शरियत कायद्याचा अपप्रचार करून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात हिंदूचे मंगळसूत्र घेऊन मुस्लिमांना वाटले जाणार असल्याचे आरोप मोदी करतात असतात. मात्र मोदींना माहिती नाही की मुस्लिम समाज ‘दान’ घेण्यावर नाही तर देण्यावर लक्ष केंद्रित करणारा धर्म आहे. त्यामुळे धर्माधर्मात तेढ निर्माण करून देशाची अखंडता विस्कळीत करण्याचा प्रयत्न भाजपने करू नये असे हुसेन म्हणाले.