हंगामी रोजगार गेल्यामुळे विक्रेत्यांना आर्थिक फटका
प्रसेनजीत इंगळे
विरार : करोनाच्या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्या वर्षीसुद्धा शासनाने दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने गोविंदा पथक आणि आयोजक यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे या उत्सवात निर्माण होणाऱ्या रोजगारांवर गदा आल्यामुळे अनेकांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
वसई-विरारमध्ये विविध राजकीय पक्ष, सार्वजनिक मंडळे, गोविंदा पथक दरवर्षी मोठय़ा उत्साहात भरघोस पारितोषिके ठेवून उंच उंच दहीहंडी उभारत असतात. यात मुंबई, ठाणे, पालघरमधून मोठय़ा प्रमाणात गोविंदा पथके सामील होत असतात. यासाठी तीन ते चार महिन्यांपासून तयारी केली जाते. यामुळे अनेक छोटे छोटे रोजगार उपलब्ध होतात. यात टी-शर्ट, फलक, फूलवाले, मडकी विक्रेते, सफाई कर्मचारी, बंजोवादक, सांस्कृतिक कलाकार, गायक, सिनेकलाकार, मानचिन्ह बनविणारे, मंडप सजावटकार आणि कार्यक्रमाच्या दिवशी पदार्थ विक्री अशा अनेकांना या उत्सवात चांगले पैसे मिळतात. अनेक कलाकार वर्षांतून या सणांच्या माध्यमातून आपल्या आर्थिक उत्पन्नात भर टाकत असतात. गणपती, नवरात्री, दिवाळी या उत्सवांच्या कालावधीत या विक्रेत्यांची लाखोंची उलाढाल होत असते. परंतु करोनामुळे या हंगामी रोजगारांना फटका बसला आहे.
वसई-विरारमध्ये २५० हून अधिक गोविंदा पथके आहेत. तर १५ ते २० मोठे आयोजक आहेत. आता करोनामुळे या उत्सवावर बंदी आल्याने अनेकांनी अगदी सध्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून हे उत्सव साजरे करण्याचे योजले आहे. यामुळे या उत्सवावर अवलंबून असलेले शेकडो रोजगार बुडाले आहेत.
केवळ उत्सवाच्या दिवशी आम्ही मैदानावर वडा-पावची आणि भुर्जी-पावची गाडी लावत होतो. एका दिवसात १० ते १५ हजार रुपये मिळत होते. यामुळे मोठा आधार मिळायचा, पण आता उत्सवच होत नसल्याने ते उत्पन्न गेले. यामध्ये मुलांच्या शाळेचा खर्च निघून जायचा.
– संतोष जाधाव, विक्रेता
दहीहंडीच्या काळात गोविंदा पथकांचे टी-शर्ट बनविण्याच्या मोठय़ा ऑर्डर्स येत असतात. दरवर्षी १ ते २ लाख केवळ या सणात उत्पन्न मिळत होते. पण उत्सवच बंद असल्याने कामगारांना काम नाही. हे मोठे आर्थिक नुकसान आहे.
– विक्षिता इंटरप्राईजेस