वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काम पूर्ण होण्या आधीच पडलेले खड्डे, सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी  याबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांनी तीव्र संताप व्यक्त करीत अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. विकसित होणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या दृष्टीने हे काही योग्य नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वसई विरार शहराच्या पूर्वेच्या भागातून गुजरात व मुंबईला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.दळणवळणाच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत महत्वाचा समजला जातो. दररोज येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र मागील काही वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गावर विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. नुकताच या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र अवघ्या वर्षभरातच या रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे.

रस्ते अपघात, वाहतूक कोंडी अशा विविध समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सोमवारी राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा केला.यावेळी खासदार डॉ हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार, आमदार राजन नाईक व इतर अधिकारी व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पाहणी दौऱ्या दरम्यान रस्त्यावर निर्माण होत असलेल्या समस्यांच्या बाबत त्यांनी आढावा घेत असतानाच या भागातील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

महामार्गावर खड्डे, पाणी साचण्याची समस्या, वाहतूक कोंडी या सर्व समस्यांच्या संदर्भात संबंधित विभागाची बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहे.

पालघर जिल्हा हा विकसित होत आहे असे असताना अशा समस्यांकडे दुर्लक्ष होत असेल तर योग्य नाही असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

या दौऱ्याच्या निमित्ताने संबंधित यंत्रणांकडून रस्त्याचे नियोजन, कामाची प्रगतीबाबत आढावा घेत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या मूलभूत सुविधांमध्ये गुणवत्ता आणि गती यांचा आवश्यक समन्वय साधला जावा या दृष्टीने काम पूर्ण करावे अशा सूचना नाईक यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करा

महामार्गालगत विविध झालेला माती भराव, टाकण्यात येत असलेला कचरा व अतिक्रमण यामुळे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग  बंद झाले आहेत. त्यामुळे पाणी जाण्यास अडचणी येत आहेत. पावसाळा सुरवात होण्याआधीच हे मार्ग मोकळे करा अशा सूचना ही यावेळी करण्यात आल्या आहेत.