वसई: मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा वसई विरार शहरात दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी पहाटे पासूनच पाऊस सुरू असल्याने शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचले आहे. विशेषतः गोपाळकाल्याच्या दिवशी पावसाने शहरात धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसून येत आहे.
गोपाळ काला असल्याने शहरातील विविध ठिकाणी उत्सवाची लगबग सुरू आहे. भर पावसात ही दहीहंडी साजरी करण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहेत.तर दुसरीकडे मागील काही तासापासून शहरात पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले आहे.
यात विरार येथील विवा महाविद्यालय परिसर, साईनाथ नगर, बोळींज, ग्लोबल सिटी,नंदाखाल, यासह नालासोपारा येथील अलकापुरी, गाला नगर, संकेश्वर नगर आणि रेल्वे स्थानक परिसरांत पाणी साचले. तसेच, वसईतील सागर शेत, गिरीज रस्ता माणिकपूर, वसई गाव, बंगाली नाका, देवतलाव आणि नायगाव पूर्वेकडील स्टार सिटी, रिलायबल, सनटेक यांसारख्या विविध ठिकाणीही पाणी भरले होते.
विविध ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. अनेक रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे ये करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. तर काही ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी साचल्याने गाडीला धक्का मारावा लागला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर देखील संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती, ज्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.
पावसात गोविंदाचा उत्साह
दहीहंडीच्या दिवशी सकाळपासूनच वसई-विरार शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, गोविंदांचा उत्साह किंचितही कमी झालेला नाही. शहरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, राजकीय हंड्यांपासून ते मानाच्या हंड्यांपर्यंत गोविंदा पथकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.तर गाव पाड्यात ही पारंपारिक गोपाळकाला साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.कोसळणाऱ्या पावसामुळे गोविंदांच्या उत्साहात आणखी भर पडली असून, संपूर्ण शहर ‘गोविंदा आला रे’च्या गजरात न्हाऊन निघत आहे.