वसई: वसई विरार शहरात शनिवारी रात्रीपासूनच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे ऐन नवरात्री उत्सवात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले आहे.
मागील तीन दिवसांपासून शहरात रिमझिम पाऊस सुरूच होता. मात्र पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार शनिवारी रात्रीसाडेदहा वाजल्यापासून वसई विरार शहराच्या विविध ठिकाणच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी सचण्यास सुरुवात झाली आहे.
विजांच्या कडकडाट सुरू असल्याने शहरातील विविध ठिकाणच्या भागातील वीजपुरवठाही खंडित झाल्याचे चित्र दिसून आले आहे. नवरात्री उत्सव सुरू असल्याने शहरात विविध ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने शनिवारी मोठ्या संख्येने नागरिक गरबा खेळण्यास व त्याचा आनंद लुटण्यासाठी घराच्या बाहेर पडले होते. मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्यांच्या आनंदावर ही विरजण पडले आहे.
सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना ही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय किनार पट्टीच्या भागात वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमार बांधवांनी समुद्रात मासेमारी जाऊ नये अशा सूचना शासन स्तरावरून करण्यात आल्या आहेत.