वसई: मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा वसई विरार शहरात जोरदार कोसळण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सुद्धा पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरातील विविध भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले.
सोमवारी सुद्धा वसई विरार शहरात पावसाचा जोर कायम राहिला आहे. या पावसामुळे शहरातील विरार येथील विवा महाविद्यालय परिसर, तिरुपती नगर, एम बी इस्टेस्ट, साईनाथ नगर, बोळींज, ग्लोबल सिटी,चंदनसार, नालासोपारा मधील अलकापुरी, गाला नगर, संकेश्वर नगर, सेंट्रल पार्क, रेल्वे स्थानक परिसर, समेळपाडा, वसईतील माणिकपूर, वसई गाव यासह विविध ठिकाणी पाणी भरले. तर नायगाव पूर्वेच्या स्टार सिटी, टीवरी रस्ता, रिलायबल, सनटेक, तलाठी कार्यालया समोर अशा विविध ठिकाणी पाणी साचले होते.
सोमवार हा आठवड्यातील कामाचा दिवस असल्याने कामावर जाण्यास निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. घरापासून ते रेल्वे स्थानक गाठण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.वाहतुकीचा वेग ही मंदावला असल्याने प्रवाशांना ऑटोरिक्षासाठी रांगा लावाव्या लागल्या असल्याचे चित्र दिसून आले. रस्त्यावर पाणी साचल्याने या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना अडचणी निर्माण झाल्या तर काही गाड्या मध्येच बंद पडण्याचे प्रकार घडले. तर पाऊस जोरदार असल्याने लोकल गाड्याही दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांना लोकलची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले.
वीज पुरवठा खंडित
वसई विरार शहरात सकाळपासून पावसाचा जोर असल्याने विविध ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर काही ठिकाणी अधूनमधून वीजेचा लपंडाव सुरूच असल्याने ऑनलाइन कामकाजात अडथळे निर्माण झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
पावसामुळे शाळकरी मुलांची तारांबळ
कालपासून वसई विरार भागात पडणाऱ्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. अशातच आजपासून (१६ जून) विविध भागातील शाळाही सुरु झाल्या आहेत. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे आणि वाहतूककोंडीमुळे पालकांना मुलांना शाळेत सोडताना बरीच कसरत करावी लागली. काही विद्यार्थी रेनकोट- छत्रीच्या अभावी भिजत शाळेत पोहोचले. तर काहींनी लहान मोठ्या छत्र्याआणि रंगीबेरंगी रेनकोट घालून शाळेचा रस्ता गाठला.