जिल्ह्यत एआरडी केंद्र नसल्याने रुग्णांची फरफट

प्रसेनजीत इंगळे 

विरार : नुकताच १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन झाला. या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन करण्यात आले. पण मुळात जिल्ह्यात कोणतेही एआरडी चाचणी केंद्र नसल्याने रुग्णांना उपचारासाठी लागणारी औषधे ही मुंबईला जाऊन घ्यावी लागत आहेत. यात रुग्णांची मोठी फरफट होत आहे. त्यात पालिकेने मागणी करूनही शासनाने परवानगी दिली नसल्याने या केंद्राचा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यात एकूण २०३३  एचआयव्ही (एड्स) रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात फक्त वसई-विरार परिसरात १८३८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर पालघर जिल्ह्यात इतर ठिकाणी २०३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात यावर्षी नव्याने २३ रुग्णांची वसईत भर पडली आहे. या सर्व रुग्णांना दर महिन्याला उपचारासाठी लागणारी औषधे घेण्यासाठी मीरा-भाईंदर येथे जावे लागत आहे. ही औषधे मोफत दिली जातात पण ती आणण्यासाठी रुग्णांची मोठी फरफट होते. विरार ग्रामीण रुग्णालयात चाचणी केंद्र आहे. पण तेथे अभियांत्रिकी कायमस्वरूपी नसल्याने केवळ तीन दिवस चाचण्या केल्या जातात. पण या रुग्णांनाही उपचारासाठी औषधे मीरा-भाईंदर येथील केंद्रातूनच आणावी लागत आहेत. करोनाकाळात नागरिकांना रेल्वेने प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात औषधे घेण्यासाठी रुग्णांसाठी काही विशेष तरतूद नसल्याने अनेक रुग्ण नियमित औषधोपचार घेऊ शकत नव्हते. यामुळे पालघरमध्ये या केंद्राची नितांत गरज असतानाही शासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.  

वसई-विरार महानगरपालिकेने मागील तीन वर्षांपासून एआरडी केंद्राची मागणी शासनाकडे केली आहे. यासाठी त्यांनी वसईच्या सर डी एम पीटीट रुग्णालयात तयारी करून ठेवली आहे. पण शासनाने अजूनही परवानगी दिली नसल्याची खंत पालिकेने व्यक्त केली आहे. एकीकडे शहरातील एड्सग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना त्याच्या औषधोपचाराची कोणतीही सोय शहरात उपलब्ध नाही. यामुळे अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घाव्या लागत आहे.

पालिकेने एआरडी केंद्राची मागणी केली आहे, पण शासनाकडून अजूनही परवानगी मिळालेली नाही. परवानगी मिळताच हे केंद्र सुरू होईल. तशी पालिकेने तयारीसुद्धा केली आहे.

भक्ती चौधरी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका