लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई : १९९९२ ची दंगल, १९९३ च्या बॉम्बस्फोट झाल्यानंतर मुंबई, ठाणे जळत होती. मात्र वसई विरार शहर शांत होते. आजही वसई विरार मधील सामाजिक सलोखा आम्ही टिकवून ठेवला आहे, असे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. आजारपणातून उठल्या नंतर ठाकूर यांनी जोरदार प्रचाराला सुरवात केली असून ठिकठिकाणी ते चौक सभा घेत मतदारांशी संवाद साधत आहेत.
पालघर लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीतर्फे आमदार राजेश पाटील हे निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीला टक्कर देत बविआने लढत आहेत. पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर आजारी असल्याने कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक होती. मात्र आजारपणावर मात करत ठाकूर यांनी जोशात प्रचार सुरू केला आहे. ते ठिकठिकाणी पदयात्रा आणि नाकासभा घेत आहे. गुरूवारी ठाकूर यांनी वसई पूर्वेच्या ढेकाळे, सातीवली, कुडे,बोट, हालोली, दुर्वेश, सावरे,एंबुर या विभागात घरोघरी मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला.
आणखी वाचा-प्रदूषणकारी ४ आरएमसी प्रकल्पांवर कारवाई, अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हे दाखल
ठाकूर मतदारसंघात चौका चौकात नागरीकांशी संवाद साधताना साधून त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेत आहेत. पक्ष स्थानिक असल्याने ते जिल्ह्यात केलेली विकास कामे आणि समस्या सोडविण्यावर भर देत आहेत. विकासकामे हाच प्रचाराच मुद्दा असतो. पण आता ठाकूर यांनी शहरातील सामाजिक सलोख्याचा मुद्दा आणला आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आम्ही तीन दशकांपासून वसई विरार मधील सामाजिक सलोखा आणि शांतता टिकवून ठेवल्याचे सांगितले. १९९२ ला बाबरी मशिदी विध्दंवसानंतर सर्वत्र दंगल उसळली होती, १९९३ मध्ये बॉम्बस्फोटानंतर दंगली उसळल्या तरी वसई विरालेर शहर शांत ठेवले होते. आजही इतक्या वर्षात वसई विरार मध्ये सामाजिक शांतता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे, असे त्यांनी सांगितले. लोकशाही वाचविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान टिकवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.