वसई : वसई विरार मध्ये विविध ठिकाणी वाळू माफियांमार्फत बेकायदेशीर मार्गाने वाळू उपसा सुरूच आहे. नुकताच महसूल विभागाने विरार जवळील कसराळी शिरगाव येथील बंदरात धाड टाकून कारवाई केली आहे. यात १० बोटी व ४ संक्शन पंप उध्वस्त केले आहेत. वसई विरार मध्ये विविध ठिकाणच्या खाडी पात्रात बेकायदेशीर पणे सक्शन पंपाच्या साहाय्याने वाळू उपसा केला जाऊ लागला आहे. विशेषतः वैतरणा खाडी,शिरगाव, जुली बेट, खानिवडे, पाचूबंदर या भागात छुप्या मार्गाने वाळू उपसा होत असतो.याचा मोठा परिणाम पर्यावरण यासह बाजूच्या किनारपट्टीला बसू लागला आहे.
अशा वाळू उपसा रोखण्यासाठी शासन स्तरांवर विविध सामाजिक संघटना यांनी अनेकदा तक्रारी सुद्धा केल्या आहेत. तर २०१४ साली नारंगी येथील शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही गंभीर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर त्यावर वेळोवेळी कारवाई करण्याचे आदेश ही महसूल विभागाला देण्यात आले आहेत.मात्र वेळोवेळी कारवाई करूनही छुप्या मार्गाने वाळू उपसा करण्याचे प्रकार सुरूच आहेत.
नुकताच विरारच्या कसराळी शिरगाव कारगिल येथील भागात महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकली होती. यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी वाळूने भरलेल्या दहा बोटी वाळूसह खाडीत बुडविण्यात आल्या. ४ संक्शन पंप साखर टाकून नष्ट करण्यात आले तसेच ४ वाळूच्या कुंड्या अशी १५० ब्रास वाळू जेसीबीच्या सहाय्याने खाडीत टाकून दिली. ही कारवाई तहसीलदार डॉ अविनाश कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने केली आहे.
किनारपट्टीचा परिसर धोक्यात
मागील काही वर्षांपासून खाडी व नदीच्या पात्रात तसेच समुद्र किनारपट्टीच्या भागात छुप्या मार्गाने बेसुमार वाळू उपसा होऊ लागला आहे. त्यामुळे किनारा हळूहळू खचू लागला आहे. काही ठिकाणी किनारापट्टीवरील घरांचा पाया खचला आहे. याशिवाय विविध प्रकारची वृक्ष ही यात नष्ट झाली आहेत. तर दुसरीकडे मासळी सुकविण्यासाठी जागा ही नष्ट झाली आहे. वाळू उपसा असाच सुरू राहिला तर याचा मोठा फटका आजूबाजूच्या परिसराला बसेल यासाठी वेळोवेळी त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.