भाईंदर :- मिरा रोड येथील एका उचभ्रू सोसायटीमध्ये गरबा खेळत असताना अंडी फेकली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिरा रोड येथे जे. पी. इन्फ्रा नावाची उचभ्रू इमारत आहे. या इमारतीत सोसायटी पदाधिकाऱ्यांनी नवरात्रीचे आयोजन केले होते. रात्री सोसायटी प्रांगणात गरबा खेळण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. दरम्यान, मंगळवारी गरबा सुरु असताना वेळेचे तसेच लाऊडस्पीकर नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप येथील सदस्य मोसीन खान याने घेतला होता. यावरून सोसायटीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाला. या वादादरम्यान मोसीनने गरबा खेळणाऱ्यांवर अंडी फेकल्याचा आरोप काहींनी केला आहे.

त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक वळण लागले आणि इमारतीत मोठी गर्दी जमली. याबाबत सोसायटीचे पदाधिकारी श्रीमंत शिखरे यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरून काशीगाव पोलिसांनी मोसीन खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मात्र अंडी फेकल्याबाबत अद्यापही संशय असल्याने संबंधित आरोपीला नोटीस बजावल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश तोकडगावकर यांनी दिली.

यापूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी :

मिरा रोडच्या जे. पी. इन्फ्रा इमारतीत यापूर्वी देखील मोसीन खान या इसमाने बकरी ईद दिवशी घरात बकरा आणल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी ही इमारत देशभर चर्चेत आली होती. आता पुन्हा नवरात्रीच्या काळात धार्मिक वाद निर्माण झाल्याने इमारतीत तणावाचे वातावरण पसरले आहे.