वसई : वसई-विरार महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील ७०६ धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यातील ४१३ इमारतींच्या आलेल्या अहवालात ६१ इमारती अतिधोकादायक तर ५८ या धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. २९३ इमारतींच्या सर्वेक्षणाचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती व बांधकामे आहेत. काही इमारतींचे बांधकाम हे फारच जीर्ण झाल्याने त्या धोकादायक अवस्थेत आहेत. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण व लेखापरीक्षण करण्याचे काम नऊ प्रभागात सुरू केले होते. यात २०२५-२६ या वर्षात ७०६ इतक्या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी ४१३ अहवाल प्राप्त झाला आहे.
धोकादायक असलेल्या इमारतींची चार प्रकारात वर्गवारी केली जात असते.यामध्ये अतिधोकादायक असलेल्या इमारती तात्काळ खाली करून जमीनदोस्त करायच्या असतात तर दुसऱ्या वर्गातील इमारती खाली करून त्या दुरुस्त केल्या जातात, तिसऱ्या वर्गात इमारती खाली न करता दुरुस्त केल्या जातात तर चौथ्या वर्गात इमारतींची डागडुजी केली जाते. यावर्षी सर्वेक्षणात आतापर्यंत ६१ इमारती अतिधोकादायक आहेत यातील सर्वाधिक अतिधोकादायक इमारती या प्रभाग समिती अ आणि ई मध्ये आहेत.
तर धोकादायक मध्ये ५८ व सी टू बी मध्ये २९४ इतक्या इमारतींचा समावेश असल्याचे पालिकेने सांगितले आहे. अतिधोकादायक अवस्थेत असलेल्या इमारती खाली करून त्या जमीनदोस्त करण्याची कार्यवाही महापालिकेकडून केली जाणार आहे असे महापालिकेचे उपायुक्त दीपक सावंत यांनी सांगितले आहे. ज्यांच्या ३० वर्षाहून अधिक जुन्या इमारती झाल्या आहेत त्यांनी स्वतः हून त्याचे लेखा परीक्षण करवून घ्यावे अशा सूचना ही पालिकेने केल्या आहेत.
अतिधोकादायक व धोकादायक प्रवर्गातील इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण पूर्ण केले आहे.नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने धोकादायक इमारती खाली कराव्यात जेणेकरून भविष्यातील दुर्घटना टाळता येईल असे आवाहन करीत आहोत.
:- अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महापालिका
जमीनदोस्त केल्या जाणाऱ्या इमारतीमधील सदनिकाधारकांना प्रमाणपत्र
अति धोकादायक वर्गवारीत मोडणाऱ्या इमारती या पालिकेकडून जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.मात्र त्यानंतर
जागेचा मूळ मालक किंवा संबंधित विकासक पुन्हा त्या ठिकाणी पुनर्विकास करण्यास अडथळे निर्माण करण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मूळ सदनिकाधारकांना त्यांची सर्व कागदपत्रे तपासून त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे ते या इमारतीत राहत असल्याचा पुरावा म्हणून वापरता येणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.
संक्रमण शिबीराचा अभाव
धोकादायक व अतिधोकादायक इमारतीमध्ये रहिवासी राहत आहेत. त्यांना पालिकेच्या वतीने इमारत खाली करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे जरी असले तरी या नागरिकांच्या राहण्याची सोय कशी केली जाईल व इमारती खाली करून कोणत्या ठिकाणी राहायचे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालिकेकडे संक्रमण शिबीर नाही तसेच त्याची कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी राहण्याची सुविधा करण्याची तरदूत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
प्रभाग निहाय धोकादायक इमारती
प्रभाग अतिधोकादायक
ए – ११
बी – ०३
सी- ०८
डी- ०३
ई- १५
एफ – ०२
जी – ०७
एच – ०५
आय- ०७
एकूण ६१